भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या १७ वर्षीय कुस्तीपटू मुलीच्या वडिलांनी बुधवारी त्यांचा जबाब फिरवला आहे. या वडिलांनी बृजभूषणविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर मुलीचे शोषण केल्याचा आरोप होता. मात्र आता त्यांनी कुस्ती महासंघाकडून भेदभाव होत असल्याबद्दल रागाच्या भरात तक्रार केल्याचे म्हटले आहे.
‘बृजभूषणने माझ्या मुलीसोबत कोणताही गैरप्रकार केलेला नाही. लैंगिक शोषणाची कोणतीही तक्रार झालेली नाही. मात्र माझ्या मुलीसोबत भेदभाव झाला आहे,’ असे त्यांनी बुधवारी सांगितले. ‘मी त्या लढाईत एकटा होतो. काही कुस्तीपटू वगळता कोणी मला साथ दिली नाही. हे प्रकरण पुढे आल्यावर आम्ही दहशतीखाली जगत आहोत. मी ५ जून रोजी सर्वोच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले आहे की, महासंघाच्या अध्यक्षांनी कोणत्याही प्रकारचे शोषण केलेले नाही. मात्र भेदभाव झाल्याच्या तक्रारीवर मी ठाम आहे,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’
‘गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची वेळ आली’
गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?
लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले
कोणत्या दबावामुळे ते त्यांचा जबाब बदलत आहेत का, अशी विचारणा केली असता, ‘कोणतीही लालूच दाखवण्यात आलेली नाही आणि कोणीही दबाव आणलेला नाही. मी स्वत: जबाब बदलला आहे. माझी मुलगी अल्पवयीन आहे. मी तक्रार मागे घेतलेली नाही. केवळ जबाब बदलला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, दिल्ली पोलिसांनी बृजभूषणसिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याखाली चौकशी सुरू केली होती. मात्र आता या पित्याने जबाब फिरवल्यानंतर बृजभूषणसिंह यांच्याविरोधातील आरोपांची धार कमी झाली आहे.