मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणारे भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी पोक्सो कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यांवर पोक्सो कायद्यानुसार कारवाई केली जाते. अयोध्येमध्ये ५ जूनला होणाऱ्या संतांच्या रॅलीच्या तयारीच्या पाहणीसाठी तिथे पोहोचलेल्या बृजभूषण सिंह यांनी पॉक्सो कायद्यात बदल करण्यासंदर्भात सरकारवर दबाव आणण्यासाठी संतांची मदत घेतली जाईल, असे सांगितले. लहान मुलांसह मोठे आणि संतांसह अधिकाऱ्यांविरोधातही या कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बृजभूषण यांच्यावरही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
काय आहे पॉक्सो कायदा?
पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. या कायद्याला सन २०१२मध्ये आणले गेले होते. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांसंबधी हा कायदा आहे. १८ वर्षांखालील सर्व मुले आणि मुलींना हा कायदा लागू आहे. त्यांचे लैंगिक शोषण होण्यापासून संरक्षण करणे हा या कायद्याचा हेतू आहे. या कायद्यांतर्गत १८ वर्षांखालील मुलांना लहान मुले समजून त्यांच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी दोषींना कडक शिक्षेची तरतूद केली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत आधी मृत्युदंडाची शिक्षा नव्हती. मात्र सन २०१९मध्ये यात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. या कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा मिळाल्यास आजीवन तुरुंगवास भोगावा लागतो. म्हणजे या कायद्यातील दोषी कधीही तुरुंगाबाहेर येऊ शकत नाही.
कठोर शिक्षेची तरतूद जर कोणा व्यक्तीने १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्यास त्याला या प्रकरणात कमीत कमी २० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो. तसेच, दोषी व्यक्तीला मोठा दंडही ठोठावला जातो. लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला असेल तरीही किमान २० वर्षांचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. यामध्येही जिवंत असेपर्यंत कारावास आणि दंड ठोठावला जातो. लहान मुलांचा वापर पोर्नोग्राफी करण्यासाठी केल्यास पहिल्या वेळेस पाच वर्षांची तर दुसऱ्या वेळेस सात वर्षांची शिक्षा सुनावली जाते. तसेच, दंडही ठोठावला जातो.
हे ही वाचा:
गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा
‘आशिष विद्यार्थीने माझी कधीही फसवणूक केली नाही’
फडणवीस म्हणाले, शहरी नक्षलवाद्यांची विद्यापीठांमध्ये घुसखोरी
‘सारे जहाँसे… ’ लिहिणारे कवी इक्बाल अभ्यासक्रमातून ‘आऊट’
जर कोणी लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफीचा व्हिडीओ साठवत असेल, दाखवत असेल किंवा कोणाला देत असेल तर या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते. जर कोणी व्यक्ती मुलांशी संबंधित पोर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर करत असेल तर, पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास पाच ते सात वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
सन २०२१मध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत देशभरात सुमारे ५४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. पाच वर्षांत ६१ हजार ११७ आरोपींवरील सुनावणी पूर्ण झाली असून २१ हजार ७० जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर, ३७ हजार ३८३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.