बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर शाहरुख खानला चांगलाच व्यावसायिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर एका मोठ्या ब्रँडने शाहरुखसोबतचे नाते संपवल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बायजू’ ब्रँडने आगाऊ पैसे भरल्यानंतरही शाहरुख खानच्या जाहिराती बंद केल्याचे वृत्त आहे.
‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तानुसार एडटेक स्टार्टअपने आगाऊ बुकिंग असूनही शाहरुख खानच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आर्यन खानच्या अटकेनंतर थेट ‘बायजू’लाच शाहरुख खानला जाहिरातीत घेण्यावरून ट्रोल केले होते. ‘बायजू’च्या प्रवक्त्याने या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हे ही वाचा:
कोरोना योद्ध्यांना ठाकरे सरकार कधीपरदेश ‘सन्मान’ देणार?
‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!
खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?
‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’
शाहरुख खानचा ‘बायजू’सोबतचा करार तीन ते चार कोटी रुपयांच्या वार्षिक शुल्कावर निश्चित करण्यात आला आहे. शाहरुख खान २०१७ पासून कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुखला उद्देशून, ‘तुम्ही स्वतःच्या मुलाला काही शिकवू शकला नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’, असा सवाल ट्रोलर्सनी केला होता.
‘बायजू’ या एका शैक्षणिक अॅपचा शाहरुख मॉडेल असून लोकांनी थेट कंपनीच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करून कंपनीने शाहरुखबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन केले होते. याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता ‘बायजू’ने शाहरुख खानच्या जाहिराती बंद केल्या आहेत. मात्र, शाहरुखला पूर्णतः ब्रँडमधून काढण्यात आले की नाही याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही.