ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

‘मंगळवारपासून शाळा सुरू होणार असल्याने मुलांनी समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी ट्यूशन क्लासला दांडी मारली होती. आठ मुले घरात व्हिडिओ गेम खेळत होती. मात्र, संध्याकाळी पाच वाजता ती सर्व घराबाहेर पडली. ती कुठे जात आहेत, हे कोणीच आम्हाला सांगितले नाही. त्यामुळे आम्हाला वाटले की, ते नेहमीप्रमाणे त्यांच्या ट्युशन क्लासला जात असतील. पण, संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांचा आम्हाला फोन आला आणि आम्ही हादरलो,’ जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या एका मुलाच्या काकीचा हे सांगताना बांध फुटत होता.

वाकोल्यामधील आठ मुले सोमवारी संध्याकाळी जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेले, तेव्हा ही मजा आपल्याला किती महागात पडेल, याची त्यांना सुतरामही कल्पना नसेल. संध्याकाळी सुटलेल्या चक्रीवादळाच्या वाऱ्याने हे सर्व भारावून गेले होते. यापैकी कोणालाही पोहता येत नव्हते, तरीही त्यांना समुद्राच्या पाण्यात डुंबण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्यातील चार मुलांना वाचवण्यात यश आले असले तरी अन्य चौघे अरबी समुद्राच्या पाण्यात ओढले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाने रात्री उशिरा वाईट हवामानामुळे अखेर शोधमोहीम थांबवली असून सकाळी पुन्हा त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारपासून शाळा सुरू होणार असल्याने वाकोल्यातील वाघरी पाडा येथे राहणारे आठ मित्र जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनारी गेले होते. त्यातील पाच जण पाण्यात गेले. संध्याकाळी साडेपाच वाजता दोन भावांसह चार जण समुद्राच्या पाण्यात ओढले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी वाढत गेल्याने ही मुले किनाऱ्यापासून तब्बल अर्धा किमी आत ओढली गेली.

जय ताजबरिया (१५), मनीष ओगानिया (१२), त्याचा मोठ भाऊ शुभम ओगानिया (१५) आणि धर्मेश फौजिया (१६) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. ‘फौजियाची स्लिपर तेथील एका दगडावर सापडली,’ अशी माहिती पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. अग्निशमन दलाची गाडी येण्याआधीच एका मच्छिमाराने समुद्रात उडी मारून एका मुलाचा जीव वाचवला.

अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती संध्याकाळी सुमारे सहा वाजून ५० मिनिटांनी समजली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली. जेट- स्की आणि जीवरक्षक जॅकेट आदी सुरक्षा साधनांच्या मदतीने मुलांचा शोध सुरू करण्यात आला. त्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली. भारतीय नौदलानेही या शोधमोहिमेसाठी ‘सीकिंग हेलिकॉप्टर’ ही दिले. पोहणाऱ्यांचे पथकही सज्ज होते. मात्र, समुद्राला उधाण आले असल्याने त्यांना पाठवणे धोक्याचे होते. त्यामुळे त्यांना पाठवण्यात आले नाही. दरम्यान, मुलांचे पालक आणि शेजाऱ्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी या मुलांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, ते त्यांची नजर चुकवत जेट्टीवर बसले होते. चार मुलं जेट्टीच्या खालच्या भागात बसले होते. तर, चार मुलं वरच्या भागात बसले होती. ‘ही जेट्टी केवळ मच्छिमारांसाठी खुली असते. मात्र, पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढण्याची भीती असल्याने त्यांनाही त्या काळात येथे येण्याची परवानगी नाही,’ असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, लाटांच्या तडाख्याने पाच मुले खेचली गेली. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले. त्या चौघांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ती जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे,’ असे हा अधिकारी म्हणाला.

हे ही वाचा:

सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!

जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग

शोधमोहीम सुरू असताना धर्मेश तलसानिया आणि कौशल ताजपरिया हे जेट्टीवर बसले होते. तर, घाबरलेले दिपेश अगारिया आणि अंकित भोजविया घरी परतले. अग्निशमन दल आणि स्पीड बोटी घटनास्थळी आल्या होत्या, मात्र वाईट हवामानामुळे त्या समुद्रात जाऊ शकल्या नाहीत, अशी माहिती जुहू कोळीवाडा येथील लार्सन फर्नांडिस या रहिवाशाने दिली.

वाकोल्यातील वाघरी समाज हे मुख्यतः फेरीवाले असून ते घरोघरी कपड्यांची विक्री करतात. ते सुरतवरून साडी आणून स्थानिक दुकाने आणि घरांमध्ये विकतात. त्यांच्या मुलांनी शाळा शिकून, शिक्षणात प्रगती करून चांगले आयुष्य जगावे, यासाठीच ही कुटुंबे अहोरात्र मेहनत घेत असतात,’ असे एका शेजाऱ्याने सांगितले.

Exit mobile version