३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने पंजाब व छत्तीसगडवर तर किशोरी संघाने केरळवर विजय मिळवत विजयी घोडदौड कायम राखली. या स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडीयम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे.
आज किशोरांच्या सामन्यात महाराष्ट्राच्याने पंजाबवर विजय मिळवताना १८-७ असा एक डाव ११ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या आशिष गौतमने नाबाद ३.४० मि. संरक्षण केल, अथर्व पाटीलने ३ मि. संरक्षण करून ३ गडी बाद केले. जितेंद्र वसावेने २.४० मि. संरक्षण करून ३ गडी बाद केले. सोत्या वळवीने ४ गडी बाद करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. तर पंजाबच्या सन्नी (३ गडी) व गुविंदार सिंह (२ गडी ) यांनीच चांगला खेळ केला.
महाराष्ट्राच्या दुसर्या सामन्यात किशोर संघाने छत्तीसगढचा १७-७ असा एक डाव १० गुणांनी पराभव केला. यामध्ये महाराष्ट्राच्या आराध्य वसावे याने २.२० मि. संरक्षण करत ४ गडी बाद केले. त्याला अर्थव पाटीलने नाबाद २.४० मि. संरक्षण करत 3 गडी करुन चांगली साथ दिली. तसेच मोहन चव्हाणने २.५० मि. संरक्षण केले आणि जिशान मुलाणीने 3 गडी बाद केले. पराभूत छत्तीसगढतर्फे यशवंत कुमारने केलेले खेळ वगळता अन्य कोणालाही चांगला खेळ करता आला नाही.
किशोरी गटात महाराष्ट्रने केरळ संघावर २५-५ असा एक डाव २० गुणांनी मात केली. महाराष्ट्रने पहिल्या डावातील आक्रमणात 25 खेळाडू बाद करुन केरळपुढे मोठे आव्हान ठेवले. यामध्ये अंकिता देवकरने ८ खेळाडू तर धनश्री करेने ५ खेळाडू बाद करत चांगली कामगिरी केली. संरक्षणामध्ये अंकिता देवकरने २ मिनिटे तर धनश्री कंकने ३.३० मि. व एक खेळाडू बाद केला आणि सानिका चाफेने २ मि. संरक्षण करत विजयांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. पराभूत केरळतर्फे एस हर्षदाने चांगली लढत दिली. तर उर्वरित खेळाडूंना जास्त काळ मैदानावर तग धरला आला नाही त्यामुळे महाराष्ट्राला मोठा विजय साजरा करता आला.
किशोर गटात कोल्हापूराने विदर्भाचा १४-१३ असा ३.३० मि. राखून एक गुणाने पराभव केला. कोल्हापूरच्या शरद (३.२० मि. संरक्षण व २ गडी ), प्रेमनाथ (२ मि. संरक्षण व २ गडी) उदयने ( १.१० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी तर विदर्भाच्या हर्षलने (२.१ मि. संरक्षण व १ गडी), मोहितने (१.३०, १ मि. संरक्षण व 1 गडी) व पीयूषने ३ गडी बाद करत मोजक्या प्रेक्षकांची दाद मिळवली.
हे ही वाचा:
न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला
‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’
शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’
या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान
किशोरी गटात कोल्हापूराने तेलंगणाचा २०-४ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. कोल्हापूरच्या राजेश्वरी (४:३० संरक्षण व २ बळी), अमृता पाटील (४.४० मि. संरक्षण व १ बळी) तर तेलंगणाच्या बी. अपर्णाने चांगला खेळ केला.
किशोरांच्या इतर समन्यांमध्ये उत्तर प्रदेशने तमिल्नाडूचा १६-८ असा पराभव केला. तेलंगणाने झारखंडचा १७-१५ असा पराभव केला. कर्नाटकने बिहारला २९-४ असा पराभव केला.
किशोरींच्या इतर समन्यांमध्ये कर्नाटकने प. बंगालच ९-६ असा पराभव केला. आंध्र प्रदेशने झारखंडचा २०-१९ असा पराभव केला.