बोहरा सीसीने जिंकली ‘नवाब सालार जंग ट्रॉफी’

सोव्हेनियर क्रिकेट क्लबवर मिळविला विजय

बोहरा सीसीने जिंकली ‘नवाब सालार जंग ट्रॉफी’

फॉर्मात असलेल्या बोहरा क्रिकेट क्लबने कमालीचे सातत्य राखताना इस्लाम जिमखाना आयोजित ७३व्या नवाब सालार जंग आमंत्रित टी- २० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी सोव्हेनिर क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी पराभव केला.  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मरीन ड्राइव्ह येथील इस्लाम जिमखाना मैदानावर विजेत्या बोहरा सीसीने सर्व आघाडय़ांवर चमकदार खेळ केला.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बोहरा सीसी २० षटकांत १६७ धावांची मजल मारली. सलामीवीर साहिल गोडे (४३ धावा, २० चेंडू, ८ चौकार,एक षटकार) आणि जपजीत रंधावाने (४२ धावा, ३१ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) अवघ्या ५.२षटकात ६१ धावांची झटपट सलामी देत बोहरा सीसीला चांगली सुरुवात करून दिली.

त्यानंतर रंधावा आणि ओम केशकामत यांनी (४२ धावा, २८ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार) तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडताना क्लबला चांगली धावसंख्या गाठून दिली. सोव्हेनिर सीसीकडून डावखुरे मध्यमगती गोलंदाज हुसेन रझा, आतिफ अत्तरवाला आणि इरफान उमेरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोव्हेनिर सीसीची मजल २० षटकांत ८ बाद ११९ धावांपर्यंतच गेली. बोहरा सीसी ऑफस्पिनर हिमांशू सिंग याने ३० धावांत ४ विकेट घेत सोव्हेनिर सीसीच्या डावाला खिंडार पाडले. पहिल्या तीन षटकांत फक्त १७ धावा देऊन तीन झटपट विकेट गमावल्यामुळे सोव्हेनिर सीसीची सुरुवात डळमळीत झाली.

आघाडीच्या फळीतील निखिल पाटील (३४ धावा, ३४ चेंडू, २ चौकार) आणि मधल्या फळीतील सुजीत नायक यांनी (३४ धावा, ३० चेंडू, ४ चौकार) चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर अंकित चव्हाणने (२१ धावा) थोडा प्रतिकार केला तरी त्याला अन्य सहकार्‍यांची अपेक्षित साथ लाभली नाही. हिमांशू सिंगसह जहांगीर अन्सारीने (१७ धावांत २ विकेट) अचूक गोलंदाजी करताना बोहरा सीसीचा विजय आणखी सुकर केला.  भारताचे माजी क्रिकेटपटू केनिया जयंतीलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाला. चॅम्पियन बोहरा सीसीला नवाब सालार जंग ट्रॉफी आणि रोख एक लाख रुपये आणि उपविजेत्या सोव्हेनिर सीसी संघाला उपविजेत्या संघासाठीची ट्रॉफी आणि रोख ७५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई

‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’

जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’

पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये बोहरा सीसी संघाचा साहिल गोडे याने ‘मॅन ऑफ द फायनल’ पुरस्कार जिंकला. ‘सर्वोत्कृष्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जपजीत रंधावा याला (२०५ धावा, एक शतक) आणि ‘ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक हिमांशू सिंगला (४ सामन्यात १२ विकेट) मिळाले. तिघांनाही ट्रॉफी आणि प्रत्येकी रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

संक्षिप्त धावफलक – बोहरा सीसी – २० षटकांत सर्वबाद १६७ (साहिल गोडे ४३ , जपजीत रंधवा ४२ , ओम केशकामत ४२ ; हुसेन रझा २-१८, आतिफ अत्तरवाला २-२३, इरफान उमैर २-४२ ) वि. सोव्हेनिर सीसी -२० षटकांत ८ बाद ११९ (निखिल पाटील ३४ , सुजीत नायक ३४, अंकित चव्हाण २१, हिमांशू सिंग ४-३०, जहांगीर अन्सारी २-१७) निकाल: बोहरा सीसी ४८ धावांनी विजयी.
वैयक्तिक पुरस्कार: अंतिम सामनावीर: साहिल गोडे (बोहरा सीसी) – ४३ धावा (२०चेंडू, ८ चौकार,एक षटकार).
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज: जपजीत रंधावा (बोहरा सीसी) – २०५ धावा (एक शतक).
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज: हिमांशू सिंग (बोहरा सीसी) – ४सामन्यांत १२ विकेट.

Exit mobile version