पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे विहिरीचे बांधकाम सुरू असताना अपघात होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. दोन दिवसांपासून या अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू होते. अखेर, शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत.
म्हसोबाचीवाडी येथे १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास सापडले. चारही मजुर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असून मजुरांच्या अपघाती निधनामुळे गावावरती शोककळा पसरली आहे.
म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते. यासाठी बेलवाडी गावातील दहा ते बारा मजूर एका ठेकेदाराकडे रोजंदारीवरती काम करीत होते. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (३२), जावेद अकबर मुलाणी (३०), परशुराम बनसीलाल चव्हाण (३०), लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (५५) हे चौघे जण सकाळी लवकर कामावरती गेले. दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये पडले. त्यांच्या अंगावरती मुरुम आणि माती पडल्याने ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
हे ही वाचा:
एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही
पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी
मुंबईत समुद्र किनाऱ्यावर आढळले दोघा भावांचे मृतदेह
इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!
त्यानंतर रात्रभर पाच पोकलेन मशिनच्या सहाय्याने माती आणि मुरुम असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. चारही कामगार संध्याकाळी आपल्या घरी परतले नाहीत तेव्हा शोधाशोध सुरू झाली. शोध घेत असताना विहरीजवळ हा अपघात झाल्याचे लक्षात आले. विहिरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसल्या, मात्र ते चार लोक सापडले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली होती.