बिहारमधील मुजफ्फरपूर येथे गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली एक बोट नदीत उलटल्याची धक्कदायक आणि भीषण घटना घडली आहे. अपघातग्रस्त बोटीत ३४ विद्यार्थी असून त्यातील १८ विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बागमती नदीत गुरुवारी सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. बागमती नदीतून जाताना अचानक ही बोट डळमळू लागली आणि काही अंतरावर गेल्यानंतर ही बोट विद्यार्थ्यांसह उलटली. या नदीवर वाहतुकीसाठी पूल बांधण्यात यावा अशी मागणी सुरू होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दा चर्चेत राहिला होता, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
#WATCH | Boat carrying school children capsizes in Bagmati river in Beniabad area of Bihar's Muzaffarpur pic.twitter.com/TlHEfvvGYy
— ANI (@ANI) September 14, 2023
विशेष म्हणजे इतकी भीषण दुर्घटना होऊनही, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा अधिक अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाची यंत्रणा पोहचेपर्यंत स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली होती. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरु आहे. १६ विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले असून १८ विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहेत.
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार
मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध
‘इंडिया’ गट काही टीव्ही अँकरवर बहिष्कार घालणार
बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. या अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून मदत दिली जाईल,” असं नितीश कुमार म्हणाले. दरम्यान, त्यांचा गुरुवारी मुजफ्फरपूर येथे दौरा असून अशा परिस्थितीत दौऱ्याच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे.