मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळतंय. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस पडतोय. तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसतोय. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. यामुळे दुचाकी आणि चार चाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने मात्र चांगलीच तारांबळ उडवली आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही महानगरपालिकेच्या कारभारामुळे मुंबईकरांना पावसामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात, गेल्या दोन ते तीन तासांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली.
हे ही वाचा:
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?
बालिका वधूच्या ‘दादी सा’ चे निधन
ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे
अंधेरीतील डीएन नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. मुंबईतील अनेक भागात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होतं. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.