मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी दिवस-रात्र शहराच्या स्वच्छतेसाठी झटत असताना काही नागरिक विशेषतः दुकानदार रस्त्याच्या कडेला कचरा टाकून शहराच्या विद्रुपतेत भर टाकत असतात. त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या आणि पळून जाणाऱ्या दुकानदारांचा माग काढून त्यांच्याकडून दंडवसुली केली आहे.
भल्या पहाटे किंवा सकाळी शहरातील रस्त्यांची स्वच्छता केल्यानंतर दादर पश्चिमेकडील अनेक दुकानदार रस्त्याच्या कडेला कचरा टाकून पळून जात होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. हा कचरा कोणी टाकला, याबाबत विचारल्यावर दुकानदार हात वर करत असत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी या दुकानदारांचा माग काढण्याचे ठरवले. कर्मचाऱ्यांनी एका कचऱ्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना एका कपड्याच्या दुकानांच्या काही पावत्या सापडल्या. त्यामुळे नाईलाजाने का होईना, या दुकानदाराला २०० रुपयांचा दंड भरावा लागला.
‘मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दररोज सकाळी सात ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रस्ते आणि पदपथांची स्वच्छता करतात. मात्र अनेक दुकानदार दररोज सकाळी नऊ ते १० वाजेपर्यंत दुकाने उघडतात. त्यानंतर हे दुकानदार त्यांच्या दुकानात जमा झालेला कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर किंवा पदपथावर फेकतात. जेव्हा आम्ही या दुकानदारांना विचारायचो, तेव्हा कोणीही कचरा टाकल्याची कबुली देत नसत. काहीवेळा शेजारचे दुकानदार किंवा फेरीवाले कचरा कोणी टाकला, हे सांगत असत,’ असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!
उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या विविध अपघातात १६ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय खेळांमध्ये डोपिंगमध्ये अडकले २५ खेळाडू
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?
मुंबई महापालिकेने या दुकानदारांना त्यांना जी वेळ योग्य वाटेल, त्या वेळी दुकानात स्वच्छता कर्मचारी येतील आणि कचरा जमा करून देतील, असा प्रस्ताव दिला आहे. तरीही दुकानदार रस्त्यावर कचरा टाकत होते. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी कचरा टाकणाऱ्याचा शोध घेण्यासाठी या कचऱ्याचीच तपासणी करण्याचे ठरवले.
मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डने ऑक्टोबर ते २६ डिसेंबर या कालावधीत अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या ६२ जणांवर २०० रुपयांपासून १० हजारांपर्यंत दंड आकारला आहे. ‘नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अभियानाला मदत केली पाहिजे. नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत जागृती निर्माण करण्यासाठीच हा दंड आकारला जात आहे,’ असे जी वॉर्ड विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता इरफान काझी यांनी स्पष्ट केले.