अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट

पालिका अधिकाऱ्याला केली मारहाण आणि दमदाटी

अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट

बांद्रा येथे उद्धव ठाकरे गटाची असलेली एक शाखा मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत असल्यामुळे तोडली. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याला नंतर वेगळे वळण मिळाले ते त्या शाखेत असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटविल्यामुळे किंवा त्यावर हातोडा चालविल्याचा आरोप केल्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांची त्या शाखेत असलेली मूर्ती हटविल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. त्यातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली.

शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. आदित्य ठाकरे यांनी अशापद्धतीने हातोडा चालवला तर प्रतिक्रिया येणारच असे म्हणत या मारहाणीचे एकप्रकारे समर्थनच केले. ही मारहाण केली जात असताना माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब हेदेखील तिथे उपस्थित होते. त्यांनी महिला अधिकाऱ्याला दमदाटी करत तो अधिकारी कोण, त्याला इथे बोलवा असे म्हणत सदर शाखा तोडल्याबद्दल जाब विचारला.

अनिल परब यावेळी म्हणाले की, बाळासाहेबांच्या फोटोला हात कसा लावला. कोण अधिकारी आहे तो दाखवा, त्याला बोलावून घ्या. त्याचवेळी तो अधिकारी आल्यावर त्याला कार्यकर्त्यांना थोबाडीत मारली. त्याला परब यांनी नाल्यावर ही शाखा बांधली तर नोटीस कशी दिली असा प्रश्न विचारला. त्या अधिकाऱ्यावर इतर कार्यकर्तेही डाफरत होते.

या शाखेवर कारवाई करताना जेसीबीचा वापर करून ती हटविण्यात आली होती, त्यावरून नंतर राजकारणास सुरुवात झाली. आदित्य ठाकरे म्हणाले की, माहीममधील आमदाराने गोळ्या चालवल्या त्याला शिक्षा द्या. उपमुख्यमंत्र्यांनी आधी माहीममध्ये यावं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हातोडा चालविण्यात आला तर त्यावर प्रतिक्रिया उमटणारच.

 

अनिल परब पालिका कार्यालयात येऊन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्या शाखेत होता. शिवाजी महाराजांची मूर्ती होती. ती बाहेर काढण्याची मागणी शिवसैनिक करत होते पण ते न करता बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आला. बाळासाहेबांचा, शिवाजी महाराजांचा अपमान शिवसैनिक सहन करणार नाहीत.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केल्यावर दोषींवर कारवाई नक्कीच होईल. कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्याच्यावर कारवाई करूच असे आश्वासन दिले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्याला मारहाण करणे हे कार्यकर्त्यांना भोवणार आहे.

हे ही वाचा:

“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!

सूरज चव्हाणचा, सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना?

सदावर्तेंनी केली परतफेड; ‘शरद पवार’ पॅनेलला केले पराभूत

कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख

या शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पालिका अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची भेट घ्यावी अशी मागणी केली जात होती, पण ती टाळली जात होती. अखेर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या कार्यालयात जात जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या अधिकाऱ्याला मारहाण झाली.

Exit mobile version