मागील काहीदिवसांपासून मुंबईत घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेल्फ टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर देखील रुग्ण पालिकेला कळवत नसल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे यापुढे कोरोना टेस्टचे सेल्फ किट विकणाऱ्या औषध विक्रेत्यांना सेल्फ टेस्टकिटची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यायबाबत येत्या दोन दिवसांत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईत दररोज पालिका आणि खासगी प्रयोगशाळेत सुमारे ५० ते ६० हजार कोविड चाचण्या केल्या जातात. तरीही सेल्फकिट आणून घरीच चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणार वेळ आणि बाधित झाल्यावर होणाऱ्या निर्बंधातून सुटका करून घेण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरगुती चाचणी संचाची मागणी वाढली आहे. या चाचणीचा अहवाल पालिका प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी किटवरील स्कॅनरच्या माध्यमातून नोंद करणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे ही वाचा:
‘चन्नी, सिद्धू मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत’
बिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले
साथीच्या रोगासाठी ठेवलेला पालिकेचा निधी आधीच संपला!
कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद
सेल्फकिटचे वितरण करणारे वितरक आणि विक्री करणारे औषध विक्रेते यांना खरेदी करणाऱ्याचे नाव, पत्ता, संपर्क, खरेदी केलेले नग याची माहिती पालिकेला पाठवावी लागणार आहे. रुग्णांना कोरोना निरीक्षण कक्षांना सेल्फकीट खरेदीदारांची खरी माहिती देणे अपेक्षित आहे. ही माहिती खोटी दिल्यास आणि रुग्णाची लक्षणे तीव्र झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी पालिकेला योग्य ती माहिती द्यावी.