मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाड्यांमधील कर्मचारीच रस्त्यांवर कचरा करत असल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील गजबजलेले ठिकाण म्हणजे दादर रेल्वे स्थानकाबाहेर हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या नक्षत्र मॉल समोर अशीच एक महापालिकेची गाडी परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी उभी असताना पालिकेचा एक कर्मचारी कचऱ्यातून प्लास्टिकच्या बॉटल वेगळ्या करत होता. तेव्हा इतर कचरा उपसत असताना हा कचरा सगळा रस्त्यावर पडत असल्याचे दिसत आहे.
दादर रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या नक्षत्र मॉलमधून आणि आजूबाजूच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. हा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची गाडी सकाळी या परिसरात येत असते. मात्र, या गाडीमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यातून हे कर्मचारी प्लास्टिक कचरा वेगळा करत असतात. हा प्लास्टिक कचरा वेगळा करत असताना हे कर्मचारी गाडीतील पिशव्यांमधून त्या कशाही फाडून कचरा उपसत असतात; त्यावेळी हा कचरा सगळा रस्त्यावर पडतो. त्यानंतर या कचऱ्याकडे दुर्लक्ष करत, कचरा तिथेच तसा टाकून ही गाडी निघून जाते.
दिवसभर हा ओला- सुका कचरा एकत्र रस्त्यावर पडून राहिल्यामुळे नागरिकांना, प्रवाशांना, दुकानदारांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. हा परिसर रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे आणि बाजार भरत असल्याने या भागात सतत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. अशा वेळी पालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
हे ही वाचा:
‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’
सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र
शेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!
कोरोना महामारी आणि ओमिक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेने स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच अस्वच्छता पसरवली जात आहे. मुंबई पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून योग्य ती कारवाई करावी.