सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे कारखान्याच्या आजूबाजूचा परिसर हादरला आहे. या कारखान्यात १५ महिला मजूर काम करतात अशी माहिती आहे. पण, सुदैवाने स्फोट झाला तेव्हा कारखान्यात कोणीच नव्हते. वटपौर्णिमा असल्याने या मजूर महिलांनी कामाला सुट्टी घेतली होती. त्यामुळे स्फोटात जीवितहानी झालेली नाही.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील घारी गावात असलेल्या फटाका कारखान्यात ही घटना शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे. या कारखान्याला शुक्रवारी अचानक आग लागली. त्यानंतर कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोटही परिसरात लांबच्या लांब पसरले होते.
स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास १५ महिला मजूर काम करतात. परंतु, शुक्रवारी वटपौर्णिमा होती. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
मुकेश अंबानींचा डीप फेक व्हिडीओ वापरून डॉक्टरची फसवणूक
भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका
सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय
दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक
स्फोटात जीवितहानी झालेली नसून कारखाना मालकाला मोठी वित्तहानी झाली आहे. ४० लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.