ताडोबात दिसला दुर्मीळ काळा बिबट्या

ताडोबात दिसला दुर्मीळ काळा बिबट्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात टायगर सफारी करत असताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडे यांना दुर्मीळ अशा काळा बिबट्याचे दर्शन तब्बल दोन वेळेला झाले आहे.

मागील वर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करत असताना एक काळा बिबटा त्यांना सफारीचा रस्ता ओलांडताना दिसला. त्यावेळेला आपल्या आई आणि भावासोबत सफारी करत असलेल्या गावंडे यांनी या प्रसंगाचे वर्णन चित्तथरारक असे केले आहे. गावंडे यांनी त्याचे फोटो घ्यायचे काही प्रयत्न केले. बिबट्या एका हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गाडीच्या आवाजामुळे तो झाडीत लपला.

गेल्या वर्षीच्या या घटनेनंतर या वर्षी पुन्हा एकदा ताडोबामध्ये फिरत असताना, त्यांना पुन्हा एकदा त्याच बिबट्याचे दर्शन घडले. मात्र यावेळी तोच बिबट्या अधिक जवळून पाहता आला. त्यामुळे त्याची काही अधिक चांगली छायाचित्रे टिपण्यात गावंडे यशस्वी झाले. एक व्हिडियोदेखील त्यांना घेता आला. यावेळी बिबट्या केवळ ३० फुट दूर होता.

दुसऱ्या वेळी काळ्या बिबट्याला बघता आले. यावेळीही पहिल्यांदा बघितल्याचा आनंद मला झाला असे गावंडे यांनी टाईम्स नाऊ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

गावंडे हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असून, ‘जंगल सफारी गेटवे’ ही वेबसाईट चालवतात. त्याबरोबरच त्यांची स्वतःची संस्था असून, त्यामार्फत ते वाईल्ड लाईफ सफारी देखील घडवतात आणि लोकांना छायाचित्रणाचे धडे देखील देतात. ताडोबा सोबत त्यांनी पेंच राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान येथे देखील फोटोग्राफी केली आहे.

Exit mobile version