आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सार्वजनिक निधी उभारणीसाठी ‘देशासाठी देणगी’ ही मोहीम सुरू केली आहे. यावर भाजपने अमिताभ बच्चन आणि कादर खान यांची भूमिका असलेल्या ‘इन्किलाब’ या चित्रपटातील एक प्रसंगाची क्लिप वापरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ओदिशा आणि झारखंड येथील परिसरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे ३५१ कोटी रुपये रोख रक्कम मिळाली आहे. या घटनेशी साधर्म्य सांगणारे चित्रपटातील हे दृश्य पोस्ट करत भाजपने काँग्रेसवर वाग्बाण सोडले आहेत.
सन १९८४मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि कादर खान अभिनित या चित्रपटाचे दृश्य पोस्ट करून भाजपने ‘ या क्लिपमधील कथा आणि त्यातील व्यक्तिरेखा काल्पनिक नाहीत,’ असे नमूद केले आहे. या क्लिपमध्ये कादर खानची व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन याच्या व्यक्तिरेखेला लोकांकडून देणगी मागून काळा पैसा पांढरा करण्याची आयडिया सांगत आहे. चित्रपटातील हा प्रसंग पोस्ट करून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.
हे ही वाचा:
रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!
राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!
गाझा सीमेनजीक आढळला सर्वांत मोठा हमासचा भुयारी मार्ग!
तरुणीला गाडीने धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याच्या मुलगा अश्वजित अटकेत!
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून ‘देशासाठी दान’ ही मोहीम सुरू केली जाईल, असे जाहीर केले होते. काँग्रेसने ही मोहीम जाहीर करताच, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी भाजपवर टीका केली होती. ‘काँग्रेसची सार्वजनिक निधी उभारणीची मोहीम महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक टिळक स्वराज फंडापासून प्रेरित असल्याचे सांगून लोकांना फसवू नका. यामुळे महात्मा आणि गांधी दोघांच्या प्रतिमा मलीन होईल.
त्यांची आधीची कामगिरी पाहिल्यास हादेखील सार्वजनिक पैसा हडप करून गांधी कुटुंबाला श्रीमंत करण्याचा प्रकार आहे,’ असे शरसंधान मालवीय यांनी केले होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पुनावाला यांनीही जे गेल्या ६० वर्षांपासून देशाला लुटत आहेत, तेच आता त्याच देशाकडून देणग्या मागत आहेत,” अशी टीका केली होती. ‘काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या मोठ्या रकमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही मोहीम सुरू केली जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला.