भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या ‘संघटन पर्वा अंतर्गत’ १० जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी ‘घर चलो अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (७ जानेवारी) दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, पक्षाच्या संघटन पर्वा अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात प्रारंभ झाला आहे. ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर जाऊन या अभियानात सहभाग घेतला. १० जानेवारी रोजी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रत्येक बुथवर किमान ४०-५० घरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आहेत.
हे ही वाचा :
‘आप’ माजी जिल्हाध्यक्ष महमूद खानला बलात्कार, धर्मांतरण प्रकरणी अटक
संतोष देशमुखांचे अखेरचे शब्द…आता बास करा, मला मारू नका!
सलमान खान आता राहणार बुलेटप्रूफ काचेत
स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन
पक्षाने राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रीय सदस्य नोंदणी अभियान सुरु होईल. एका बुथवर ५ सक्रीय सदस्य नोंदवून राज्यात ५ लाख सक्रीय सदस्य नोंदविले जातील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनता सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद देईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.