ठवकर मृत्यूप्रकरणी भाजपा आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पूर्व नागपूर पारडी पोलिस स्टेशनमध्ये मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला होता. केवळ मास्क घातला नाही म्हणून त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. त्या तरुणाच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत व पत्नीला पोलिस विभागात नोकरी देण्याबरोबरच त्या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
आमदार कृष्णा खोपडे तसेच मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?
शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच
‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत
वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले
७ जुलैला मनोज ठवकर या दिव्यांग व दृष्टिबाधित तरुणाला मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली होती. दुचाकी चालविणाऱ्या मनोज यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे गेले. त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक एका पोलीस कर्मचाऱ्याला बसली. त्यानंतर रागावलेल्या पोलिसांनी मनोज ठवकर यांना त्या ठिकाणीच मारहाण केली. थोड्या वेळाने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याच मारहाणीमध्ये मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि पारडी परिसरातील नागरिकांनी केला होता.
त्यासंदर्भात आमदार खोपडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना नियमबाह्य असून पोलिस विभागाला कलंकित करणारी आहे. पोलिसांच्या अमानवीय अत्याचारामुळे या युवकाचा मृत्यू झाला आहे. मास्क घातला नसेल तर दंडाची तरतूद आहे. मात्र मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला. लोकांनी त्यावेळी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ऐकले नाही. घटनेतील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई न करता केवळ बदली केल्यामुळे यात शंका उत्पन्न होते. पोलिसांच्या मारहाणीत झालेला हा मृत्यू नसून ही हत्या आहे. त्यासाठी संबंधित पोलिसांवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. या पोलिसांवर त्वरित कारवाई करावी आणि त्या युवकाच्या कुटुंबियांना मदत द्यावी.