बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

भाजपा नेते आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभेचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (११ नोव्हेंबर) वणीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे वणीमध्ये दाखल होताच त्यांच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. खरे तर, तपासणी करणे हे निवडणुक अधिकाऱ्यांचे कामच आहे, मात्र केवळ माझ्याच बॅगेची तपासणी केल्याचे सांगत सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्टकरत उद्धव ठाकरेंनी थयथयाट केला. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युतर देत घाबरायचे एवढे कारण काय?, असा सवाल उपस्थित केला.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीटकरत म्हटले, घाबरायचे कारण काय? जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक.. कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत.. कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर कुणाचे फोडले डोळे.. मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे.. काल त्यांचे नुसते विमान तपासले म्हणून केवढे झाले ओले. युतीच्या मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी तपासले होते विमान तीच यंत्रणा वागली तुमच्याशी ही कायद्याने समान.  मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय? लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन रद्द होणार?

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कालच्या घटनेचा स्वतः व्हिडीओ शूट करत संताप व्यक्त केला होता. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी वणी येथे हेलिकॉप्टरने दाखल झालो. त्यावेळी काही अधिकारी माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी म्हटले तुमची बॅग तपासायची आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचे काम आहे, तपासून घ्या. पण माझी बॅग तपासली तशी कधी नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बॅग तपासली का? जे आपल्या बॅगा तपासत आहे, त्यांचेही खिसे तपासा हा अधिकार आहे. तपास अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या बॅग चालल्या होत्या,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराजी बोलून दाखवली होती. 

 

Exit mobile version