खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केल्याबद्दल भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बिधुरी यांच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आणि पुन्हा असे झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील चिंता व्यक्त केली. दानिश अली यांनी बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर काँग्रेसने त्यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली.
“चांद्रयान -3” च्या मिळालेल्या यशाबद्दल लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात असंसदीय भाषेचा वापर करत टीका केली.बिधुरी यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. बिधुरी यांच्या असभ्य भाषेमुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून भाजपने पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
बघू भाजप कारवाई करते की नाही :दानिश अली
बिधुरी यांच्या वक्तव्यावर बसपा खासदार दानिश अली म्हणाले, “माझ्यासारख्या निवडून आलेल्या सदस्याची ही अवस्था असताना सामान्य माणसाची काय अवस्था असेल. मला आशा आहे, मला न्याय मिळेल, सभापती चौकशी करतील कारण मला हे सहन होणार नाही, मी संसद सोडण्याचा विचार करत आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
तेलंगणा पोलिसांचा नक्षल ‘ विजय ‘
जस्टिन ट्रुडो ५० वर्षातील कॅनडाचे सर्वात वाईट पंतप्रधान!
सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !
बिधुरी यांनी फक्त माझा आणि माझ्या अनुयायांचा अपमान केला नाही तर त्यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला आहे… आता बघूया बिधुरी यांच्यावर भाजप काही कारवाई करते की, त्यांना बढती देऊन केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाते.. कदाचित अशी विधाने केवळ बाहेरच नाही तर संसदेच्या आतही करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा झाली आहे,” ते पुढे म्हणाले.
बिधुरी यांच्या निलंबनाची काँग्रेसची मागणी
लोकसभेत बिधुरी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने शुक्रवारी तीव्र आक्षेप घेत त्यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम म्हणाले, रमेश यांचे वक्तव्य हे सर्व खासदारांचा अपमान केल्या सारखे आहे त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.