१ कोटी ४० लाख जनतेचे जम्मू- काश्मीरमधील अधिकार भाजपाने २०१९ मध्ये १४० करोड लोकांना दिले

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांना पोटशूळ

१ कोटी ४० लाख जनतेचे जम्मू- काश्मीरमधील अधिकार भाजपाने २०१९ मध्ये १४० करोड लोकांना दिले

जम्मू काश्मीरमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या सर्व संक्षिप्त अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी लढण्याची आठवण त्यांनी केली. ओमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नॅशनल कॉन्फरन्स कुणालाही तडजोड करू देणार नाही किंवा आमचे हक्क हिरावून घेणार नाही.

ओमार अब्दुल्ला यांनी बारामुल्ला, हंदवाडा आणि तंगधर येथे निवडणूक रॅलींना संबोधित करताना ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्यासोबत पक्षाचे कोषाध्यक्ष शम्मी ओबेरॉयही होते. पक्षाचे उमेदवार जावेद बेग, चौधरी मोहम्मद रमजान, जावेद मिर्चल यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

ओमार अब्दुल्ला म्हणाले की, “एकेकाळी केवळ १ कोटी ४० लाख लोकांचा जम्मू- काश्मीरमधील जमीन, रोजगार, शिक्षण, नद्या, जंगले आणि इतर संसाधनांवर विशेष अधिकार होता. पण, ५ ऑगस्ट २०१९ रोजी आमचे अधिकार जबरदस्तीने काढून घेतले गेले आणि १४० करोड लोकांना दिले गेले. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कृतीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्याचा भाजपा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.” अब्दुल्ला पुढे असेही म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी विधानसभा निवडणुका होत आहेत आणि या १० वर्षांत खूप काही बदलले आहे.

हे ही वाचा : 

मुस्लीम असाल तर खरे नाव लिहा, नाहीतर दुकान बंद केले जाईल!

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता

राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

पुढे अब्दुल्ला असे म्हणाले की, “आमच्याकडून बरेच काही हिरावून घेतले आहे, आमची प्रतिष्ठा, आमचा सन्मान, आमची ओळख आमच्याकडून हिरावून घेतली गेली आहे. २०१९ च्या आधी जेव्हा विधानसभा निवडणुका होत्या, तेव्हा आमचा स्वतःचा झेंडा होता, आमची स्वतःची राज्यघटना होती, लडाख आमचा भाग होता, आमचे स्वतःचे राज्य होते, आम्हाला राज्यात आमच्या स्वतःच्या जमिनीवर अधिकार होता, आम्हाला आमच्या मालकीचा हक्क होता. स्वतःचा रोजगार, नद्या, पर्वत आणि जंगलांवर आमचा हक्क होता. पण जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने म्हणजेच पीडीपीने भाजपासाठी दरवाजे उघडले आणि शेवटी ५ ऑगस्ट २०१९ रोजी १ कोटी ४० लाख लोकांचे हक्क काढून घेतले आणि १४० करोड लोकांना दिले. त्या बदल्यात येथील लोकांना काहीही मिळाले नाही. इथल्या लोकांनी विनाश, बेरोजगारी, निराशा याशिवाय काहीही पाहिले नाही. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी गेली १० वर्षे अत्यंत अस्वस्थ करणारी आहेत,” असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

Exit mobile version