तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानाचे निमित्त साधून अण्णाद्रमुकने भाजपशी काडीमोड घेतला असला तरी भाजपने अण्णामलाई यांना पाठिंबा दर्शवला आहे.
दिवंगत द्रविड नेते सीएन अण्णादुराई यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल के. अण्णामलाई यांनी माफी मागावी, अशी मागणी अण्णाद्रमुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. तसेच, अण्णामलाई यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली होती. मात्र भाजपने याला नकार दिल्याचे समजते. तसेच, भाजपनेही आम्ही अण्णाद्रमुकला आघाडी संदर्भातील निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंतीही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
तमिळनाडूमधील अण्णाद्रमुकच्या मुख्यालयात झालेल्या चर्चेनंतर अण्णाद्रमुकने भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. ‘अण्णाद्रमुकच्या माजी नेत्यांबद्दल भाजपकडून अनावश्यक टिप्पण्या केल्या जात आहेत,’ असे या बैठकीत निदर्शनास आणण्यात आले. त्यानंतर अण्णाद्रमुकने भाजप आणि एनडीएसोबतची आघाडी त्वरित तोडण्याचा ठराव संमत केला. ‘भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाकडून गेल्या वर्षभरापासून सातत्याने आमचे माजी नेते, आमचे सरचिटणीस एडाप्पडी पलानिस्वामी आणि आमच्या कार्यकर्त्यांबाबत अनावश्यक टिप्पण्या केल्या जात आहेत,’असे अण्णाद्रमुकच्या के. पी. मुनुसामी यांनी सांगितले. भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाकडून पक्षाच्या धोरणांवर टीका करण्याऐवजी दिवंगत द्रविड नेते. सी. एन. अण्णादुराई आणि दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याबद्दल सातत्याने टीका केली जात आहे, असे कोणाचेही नाव ने घेता ठरावात नमूद करण्यात आले आहे.
काय म्हणाले होते अण्णामलाई?
‘अण्णादुराई यांनी सन १९५६मध्ये मदुराई येथे झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुत्वाचा अपमान केला होता. या वक्तव्यानंतर अण्णादुराई यांच्यावर लपण्याची वेळ आली होती. त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतरच ते प्रवास करू शकले,’ असे वक्तव्य अण्णामलाई यांनी ११ सप्टेंबर रोजी केले होते. या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्यास अण्णामलाई यांनी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजप आणि अण्णाद्रमुक पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, याचा पुनरुच्चारही केला होता. तसेच, त्यांनी आपण अण्णादुराई यांच्याबद्दल कोणतेही वाईट वक्तव्य केलेले नाही, आपण केवळ सन १९५६मध्ये घडलेल्या घटनेची आठवण करून दिली, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.