प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये तणाव कायम आहे. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेबाबत विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने सुरूच ठेवली आहेत. या संदर्भात बंगाल भाजपने उद्या (२८ ऑगस्ट) राज्यभर बंदची हाक दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज, अश्रूधुराच्या कांड्या आणि पाण्याचा मारा केल्याने ममता सरकारवर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ममता सरकारवर टीका करत, विध्यार्थ्यांच्या आंदोलनात ममता सरकारने दाखविलेल्या रानटीपणामुळे लोकशाहीची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले, बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेवर बोलणे हा गुन्हा आहे, तर ममतांच्या कारकिर्दीत बलात्कार आणि हत्या यासारख्या घटना सामान्य झाल्या आहेत. सुकांत मजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली बंगालमध्ये ममता सरकारविरोधात निदर्शने होत आहेत. यावेळी त्यांनी उद्या बंगाल बंदची हाक दिली आहे.
हे ही वाचा :
मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !
केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ सप्टेंबरपर्यंत वाढ
कॅनडामधील ७० हजारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थांना निर्वासित होण्याचा धोका
क्षत्रिय मराठा विचारे परिवाराच्या वतीने रश्मी विचारे, गीता विचारे यांचा सन्मान
दरम्यान, कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संरक्षण देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने ममता यांना ‘हुकूमशहा’ संबोधले आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिस आयुक्त विनीत गोयल यांची सीबीआयने पॉलीग्राफ चाचणी करावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.