भारतासह सर्वच देश कोविड-१९च्या महामारीतून सावरत असतानाच, भारतातल्या नऊ राज्यांत आता बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. भारताच्या हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यांत बर्ड फ्लू ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचला होता. हरयाणा राज्यात सुमारे चार लाख पक्ष्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेची सुचना देताना, हा आजार माणसांतही प्रसारित होऊ शकण्याची शक्यता वर्तवली आहे. या उद्रेकाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीच्या कृषी विभागाने पशुपालन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात जंगली तसेच पाळीव पक्ष्यांचा मृत्यू होऊ लागला तेव्हापासून हा आजार चिंतेचं कारण झाला आहे. तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी बहुतांशी हे सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या एच५एन१ या प्रजातीच्या विषाणुने बाधित होते. याशिवाय एच७एन१, एच८एन१ आणि एच५एन८ या प्रजातींनी बाधित नमुने देखील सापडले होते.
यापैकी एच५एन१ आणि एच७एन९ या प्रजातीच्या विषाणुंमूळे यापूर्वी देखील मानवाला बाधित केले होते. बर्ड फ्लू चा पहिला उद्रेक हॉंगकॉंग आणि चीन येथे १९९६-९७ मध्ये झालेला होता. त्यावेळेला या आजाराचा मृत्यूदर देखील खूप जास्त होता. बाधित झालेल्या १८ पैकी ६ रुग्णांना त्यावेळेला आपला जीव गमवावा लागला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार केव्हातरीच उद्रेक होणाऱ्या या आजारात ६० टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागतो. २००३ पासून १७ देशांत मिळून ८६२ लोकांना या आजाराची लागण झाल्याचे कळते.
महाराष्ट्रात सध्या या आजाराने धुमाकूळ घातला आहे. बर्ड फ्लू मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आजाराच्या उद्रेकामुळे कोंबड्यांचे भाव बाजारात प्रति किलो ₹१०-१२ ने घटले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची हत्या करण्याची वेळ आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात अंडी देखील फेकून द्यावी लागली आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.