बिपिन फुटबॉल अकादमीच्या ३४व्या मोफत शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले. भारताचे माजी फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. बोरिवली येथील एमसीएफ जॉगर्स पार्क फुटबॉल मैदानात हा उद्घाटन सोहळा पार पडला.
१६ वर्षांखालील मुलामुलींसाठी बिपिनच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात हे शिबीर होऊ शकले नव्हते. मात्र दोन वर्षानंतर पुन्हा एकदा बिपिनच्या निमित्ताने युवा खेळाडू मैदानात उतरले आहेत. विविध केंद्रांवर ही शिबिरे पार पडणार असून त्यानंतर साखळी आणि बाद पद्धतीने या केंद्रांमध्ये लढतीही होतील. शेवटी अंतिम सामनाही खेळविला जाईल. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत ही आंतरकेंद्र स्पर्धा होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक खासदार गोपाळ शेट्टीही उपस्थित होते. त्यांनी उपस्थित मुलांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना खेळात मोठे ध्येय बाळगण्याचा सल्ला दिला. मुलींनीही आपली ही आवड आवर्जून जोपासावी आणि राष्ट्रीय संघातून खेळण्याचे स्वप्न पाहावे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना खुशखबर
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना ‘पद्मभूषण’
पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस
दादर, वाशीमध्ये हलाल मुक्त दिवाळीसाठी आंदोलन
माजी फुटबॉलपटू परेरा यांनीही मुलांशी संवाद साधला. त्यांनी आपले अनुभव मुलांना सांगितले तसेच तंदुरुस्त राहण्याचा सल्ला मुलांना दिला. ते म्हणाले की, या खेळाच्या विकासासाठी फुटबॉल महासंघाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. भारतीय फुटबॉलमध्ये प्रगती होत आहे. त्यामुळे खेळाडूंनीही नवनवी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी खेळावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नावाजलेल्या खेळाडूंची केवळ नक्कल करू नये तर आपल्या क्षमता वाढविण्याचा आणि त्याला अनुसरून खेळण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
या शिबिरात बोरिवली, वसई-विरार, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, कुलाबा, अंधेरी, मदनपुरा असे आठ संघ सहभागी झालेले आहेत. १ जानेवारी २००७रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे.