गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा

तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती

गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ने गुजरातला धडक दिल्यानंतर राजस्थानकडे कूच केले होते. त्यानंतर चक्रीवादळामुळे राजस्थानातील जालोर, सिरोही आणि बारमेर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. यामुळे या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. जालोर, सिरोही, बारमेर आणि पाली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी २५ मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तसेच आणखी काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या वादळाचा सामना करण्यासाठी लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “मुसळधार पावसामुळे राजस्थानातील जालोर, सिरोही आणि बारमेर या जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आतापर्यंत कसलीही जीवितहानी किंवा पशुधनाचेही नुकसान झाले नाही. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे,” असे राज्य आपत्ती व मदत विभागाचे सचिव पी. सी. किशन म्हणाले.

हे ही वाचा:

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली

चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’

दरम्यान, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीभागात हाहाःकार माजला होता. या वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.

Exit mobile version