गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाने थैमान घातले असतानाच या चक्रीवादळग्रस्त भागांतील महिलांनी सुमारे ७०० हून अधिक बाळांना जन्म दिला आहे. चक्रीवादळाचा धोका असणाऱ्या आठ जिल्ह्यांतून या महिलांना बाहेर काढण्यात आले. गुजरात सरकारने या गर्भवती महिलांसाठी ५०० हून अधिक वाहने तयार ठेवली होती. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरातला धडकले.
खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातच्या किनारीपट्टी भागातून एक लाखाहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा विध्वंस झाला नसला तरी सुमारे एक हजार गावांमधील वीजयंत्रणा कोलमडली आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही. मात्र अशा कठीण, तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात आलेल्या गर्भवती महिलांनी ७०७ बाळांना जन्म दिला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या मार्गावर असलेल्या आठ जिल्ह्यांतील एक हजार १७१ गर्भवती महिलांपैकी सुमारे एक हजार १५२ महिलांना सरकारने बाहेर काढले होते. त्यापैकी ७०७ महिलांची प्रसूती झाली, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
चक्रीवादळ बिपरजॉयने गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्र प्रदेशात धडक दिली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि विध्वंस झाला. सुमारे पाच हजार १००हून अधिक वीजखांबांचे नुकसान झाले, तर चार हजार ६०० गावे विजेविना अंधारात होती. तीन हजार ५८० गावांमध्ये वीज पूर्ववत करण्यात आली आहे, तर जवळपास एक हजार गावे अजूनही वीजविना आहेत. चक्रीवादळात सुमारे ६०० झाडे उन्मळून पडली, ज्यामुळे तीन राज्य महामार्ग बंद झाले, वाहतूक विस्कळीत झाली. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. २३ लोक जखमी झाले आहेत, परंतु चक्रीवादळामुळे कोणताही मृत्यू झाला नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरित केल्यामुळे हे शक्य झाले.
हे ही वाचा:
सावरकर आमचे आदर्श, उद्धव ठाकरे गटाला आली जाग
“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर
‘बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही. आमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे,’ असे गुजरातचे मदत विभागाचे आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी शुक्रवारी सांगितले. कच्छ जिल्ह्यातून सर्वाधिक गरोदर महिलांना बाहेर काढण्यात आले. येथे ३४८ बाळांचा जन्म झाला. राजकोटमध्ये शंभर आणि देवभूमी द्वारकामध्ये ९३ बाळांचा जन्म झाला. गुजरातमधील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये ७०७ महिलांची यशस्वी प्रसूती झाल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ३०२ शासकीय वाहने आणि २०२ रुग्णवाहिका सज्ज होत्या. प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याने रात्रंदिवस परिश्रम घेतले.