संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन या कोविड-१९ वरील लसीची निर्मिती आता पुण्यातच केली जाणार आहे. भारत बायोटेककडून केले जाणारे कोवॅक्सिन लसीचे पुण्यातील उत्पादन ऑगस्टच्या अखेरीपासून सुरू होणार आहे.
हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने आयसीएमआरसोबत हातमिळवणी करून कोविड-१९ वरील संपूर्ण भारतीय बनावटीची कोवॅक्सिन ही लस तयार केली. आज भारताच्या लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड सोबत कोवॅक्सिनचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
हे ही वाचा:
आता तरी गृहपाठ करून न्यायालयीन परिक्षेला सामोरे जावे
खान मार्केटमध्ये अवैध ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्लाला जामिन नाहीच
शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन
कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो
भारत बायोटेकचेच अंग असलेल्या बायोवेट या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयातर्फे पुण्याजवळील मांजरी येथील एक लस उत्पादनाचा तयार कारखाना यासाठी वापरण्याची परवानगी मिळाली आहे. हा कारखाना सुमारे १२ एकरांवर पसरलेला आहे. ही कंपनी तेथे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची चाचपणी करत आहे. हे काम आठवडाभरात पुर्ण होणे अपेक्षित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या केंद्राला भेट देखील दिली. यावेळी बोलताना राव यांनी सांगितले की, सर्व प्रकारची तयारी पाहता त्यांना ऑगस्टच्या शेवटाकडे हा कारखाना पुर्ण क्षमतेने चालू करून लसीचे उत्पादन करणे शक्य होईल असा विश्वास वाटतो.
हा कारखाना यापूर्वी मर्क अँड कंपनी या अमेरिकन कंपनीची सहकंपनी असलेल्या इंटरवेट इंडिया प्रा. लि. यांच्या मालकीचा होता. यात प्रामुख्याने पाय आणि तोंडावरील आजारांच्या लसीचे उत्पादन केले जात होते. परंतु आता इंटरवेट इंडिया प्रा. लि आपला उद्योग बंद करत असल्याने त्यांनी लस उत्पादनाची तयार सामग्री असलेला कारखाना बायोवेटच्या हवाली करण्याचे ठरवले आहे व त्याप्रमाणे त्यांनी करार देखील केला आहे.