आपल्या खलनायकी अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण करणारे, इतर भूमिकाही तेवढ्याच समरसतेने करणारे दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्याचा उलगडा लवकरच होणार आहे. मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे बायोपिक यापूर्वी बनलेले आहेत. पण आता त्यात निळू फुले यांच्यावरील बायोपिकचा समावेश आहे.
निळू फुले यांची हिंदीसिनेसृष्टीत बायोपिक येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून, या नववर्षांतच या बायोपिकच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.
‘टिप्स’ कंपनीचे कुमार तौरानी यांनी निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांच्याकडून चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत. अद्याप यामध्ये निळू फुलेंची भूमिका कोण साकारणार, याची घोषणा झालेली नाही. कोणत्या कलाकारांना कास्ट करणार याचीही माहिती अजूनतरी गुलदस्त्यात आहे.
कुमार तौरानी यांनी सांगितले की,” निळू फुलेंनी आपल्या अभिनयाने देशभरात सर्वांची मने जिंकली आहेत. पडद्यावर खलनायक म्हणून भूमिका साकारणारे निळू फुले हे वास्तविक आयुष्यात मात्र एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते होते.
१९३० मध्ये पुण्यातील एका गरीब कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्यापासून त्यांच्या करियरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. १९५६ मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटापासून त्यांची चित्रपटसृष्टीत सुरुवात झाली होती. निळू फुले हे खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांचा अभिनय इतका उत्कृष्ट असे की खऱ्या आयुष्यातही ते खलनायक वाटत असत.
निळू फुले भारदस्त आवाज आणि संवादकौशल्यासाठी ओळखले जात होते. मराठी चित्रपटांमधील त्यांचे संवाद हे आजही मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय आहेत. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ या चित्रपटातीलही त्यांचे काम उल्लेखनीय होते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’, दिलीप कुमार यांच्यासोबत ‘मशाल’, अनुपम खेर यांच्यासोबत ‘सारांश’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होत. चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे फुले हे खऱ्या आयुष्यात मात्र हिरो होते. अंधश्रद्धा निर्मुलन, आंतरजातिय विवाह, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ यांसारख्या सामाजिक विषयांमध्ये त्यांचा पुढाकार असायचा.
हे ही वाचा:
सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!
धक्कादायक!! श्रीलंकेत १०० ग्रॅम मिरची १०० रुपयांना
महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय
…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!
२००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निळू फुले यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायम घर करुन आहेत. तेव्हा निळू फुले यांचं आयुष्य चित्रपटातून कशा पद्धतिने समोर येईल, त्यांची भूमिका साकारणासाठी कोणता ताकदीचा अभिनेता हे शिवधनुष्य पेलेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.