हाताने बनवलेल्या कुलूपांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिगढ येथील ६६ वर्षीय कारागिराने अयोध्येतील राम मंदिरासाठी ४०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे. हे कुलूप सुमारे १० फूट उंच, ४.६ फूट रुंद आणि ९.५ इंच जाड आहे. या कारागिराचे नाव आहे, सत्य प्रकाश शर्मा. त्यांनी हे ‘जगातील सर्वात मोठे हाताने बनवलेले कुलूप’ आहे, असा दावा केला आहे.
शर्मा यांनी हे कुलूप तयार करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ कठोर परिश्रम घेतले होते. जवळपास दोन लाख रुपये खर्चून बांधलेल्या या कुलूपावर प्रभू रामाचे चित्र आहे. शर्मा यांना आता हे कुलूप श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला भेट द्यायचे आहे. हे श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या आवारात ठेवले जावे, अशी शर्मा यांची इच्छा आहे. या कुलुपाच्या प्रत्येकी १५ किलो वजनाच्या आणि जवळपास त्यांच्याइतक्याच उंच असलेल्या दोन चाव्याही बनवण्यात आल्या आहेत. ‘माझी पत्नी रुक्मणी देवी (६५) हिने या प्रयत्नात मोठी भूमिका बजावली आहे आणि तिने खूप वेळ दिला आहे. आम्ही दोघांनी अत्यंत आस्थेने हे कुलूप बनवले आहे,’ असे शर्मा म्हणाले.
शर्मा हे नौरंगाबाद वसाहतीतील त्यांच्या घरातून कुलूप बनवण्याचे काम करतात. ‘मी लहानपणापासून कुलूप बनवत आलो आहे. माझे पूर्वजही कुलूपाचे काम करणारे होते. मला वाटले की, मंदिरासाठी महाकाय कुलूप बनवणे ही एक अनोखी गोष्ट असेल,’ असे ते सांगतात. सध्या त्यांनी हे कुलूप त्यांच्या घराबाहेर ठेवले आहे.
हे ही वाचा:
ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?
राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातील खासदारकी पुन्हा बहाल
गंगा नदीच्या वैविध्याचा अनुभव घेण्यासाठी ‘गंगा सस्टेनेबिलिटी रन’
अजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !
याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्याआधी मला ट्रस्टशी संबंधित इतरांशी बोलणे आवश्यक आहे,’ असे स्पष्ट केले.