देशातील सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत तीन राज्यांतील २०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये १,००० हून अधिक नक्षलवाद्यांना घेराव घातला आहे, असे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत किमान पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली असल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, ४८ तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, घेराव घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मायावी आणि मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांचा समावेश आहे.
नक्षलवाद्यांच्या पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकड्यांना वेढा घातला आहे. घनदाट जंगले आणि टेकड्यांच्या मालिकेने वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा तळ मानला जातो.
हे ही वाचा :
पीओकेमधील ४२ सक्रीय लाँच पॅडवर भारतीय लष्कराची नजर!
एका आठवड्यात देश सोडून चालते व्हा! भारताचा पाक राजदूतांना इशारा
गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी
पाकिस्तान दुश्मनच, पण देशातील त्यांचे एजंट त्याहूनही धोकादायक!
काही दिवसांपूर्वी, नक्षलवाद्यांनी एक प्रेस नोट जारी करून ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा इशारा दिला होता, ज्यामध्ये म्हटले होते की या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले आहेत. दरम्यान, या वर्षी छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये आतापर्यंत सुमारे १५० नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यापैकी १२४ नक्षलवाद्यांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तर विभागात मारले गेले आहेत.