अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून दिल्ली न्यायालयाने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत.दारू घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीकरीता ईडीकडून केजरीवाल यांना आतापर्यंत पाच समन्स पाठवण्यात आले होते.परंतु, अरविंद केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नाहीत.अखेर राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स जारी केले आहेत.अरविंद केजरीवाल यांना १७ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दारू घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय एजन्सीच्या समन्सचे पालन न केल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पाच समन्स पाठवले मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत. त्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा..
हमासने गुडघे टेकले, इस्रायलला पाठवला युध्दविरामाचा प्रस्ताव!
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला तीन नावे पाठवली
शिकागोमध्ये हल्ला झालेल्या भारतातील विद्यार्थ्याकडून मदतीची हाक
जेम्स प्रिन्सेप यांचे लिखाण आणि नकाशे ज्ञानवापी प्रकरणात महत्त्वाचे पुरावे!
ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम-५० चे पालन करून तक्रार दाखल केली. तत्पूर्वी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर हजर होऊन ईडीच्या वतीने युक्तिवाद केला.न्यायालयाच्या आदेशानंतर आम आदमी पार्टीने (आप) आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, ते न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करत आहेत आणि कायद्यानुसार कारवाई करू.
दरम्यान, ईडीने केजरीवाल यांना ३१ जानेवारीला पाचवे समन्स पाठवले होते आणि २ फेब्रुवारीला त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते ईडीसमोर हजर झाले नाहीत . यानंतर ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. समन्सचे पालन न केल्यामुळे ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.