राजस्थानमधील उदयपूर येथील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिकेने आरोपी विद्यार्थ्याच्या बेकादेशीर घरावर बुलडोझर चालवला आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. हा हिंसाचार झपाट्याने वाढला आणि शहरात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी तब्बल १५०० पोलीस कर्मचारी तैनात करावे लागले. या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनाने शनिवारी आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई केली. सध्या शहराच्या कानाकोपऱ्यात पोलीस बंदोबस्त तैनात असून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
प्रशासनाने शनिवारी (१७ ऑगस्ट) आरोपी विद्यार्थ्यावर ही कारवाई केली. महानगरपालिकेचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह आरोपी अल्पवयीन मुलाच्या घरी पोहोचले आणि आरोपीच्या घरातील सर्व सामान बाहेर काढले. यानंतर बेकादेशीर घरावर बुलडोझर चालवला. याबाबत महापालिका आणि वनविभागाने यापूर्वीच नोटीस दिली होती. या आधी घर रिकामे करून वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. वनविभागाच्या जमिनीवर घर बांधल्याने बुलडोझरची कारवाई करण्यात आली. घरावर तोडक कारवाई करत असताना वस्तीतील काही लोकांनी विरोध केला. मात्र, महापालिकेने बेकादेशीर घरावर बुलडोजर चालवून जमीनदोस्त केले.
उदयपूरमध्ये शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टियानी चौहट्टा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. यातील आरोपी हा अल्पवयीन असून तो मुस्लिम समुदायाचा आहे. आरोपी विद्यार्थ्याने वर्गातील एका हिंदू विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने महाराजा भोपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शहरातील लोक मधुबन परिसरात जमा झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर मुस्लिम समाजाने दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करून बालसुधारगृहात पाठवले आणि त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
अटल सेतूवरून उडी मारू पाहणाऱ्या महिलेला पोलिसांनी, कारचालकाने वाचवले!, थरारक व्हीडिओ व्हायरल
नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक
‘पक्ष मागितला असता तर दिला असता, वर काय घेऊन जायचं आहे?’
सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही १५०० रु. देऊ!
दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात कलम १४४/१६३ लागू करण्यात आले आहे. तसेच अनेक भागात इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यासोबतच पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रक्षाबंधनानंतर शाळा सुरू करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.