जी- २० शिखर परिषदेसाठी जगभरातून आलेल्या अध्यक्षांसाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती. त्यांच्या हॉटेलमधील मुक्कामापासून विविध ठिकाणी जाण्यासाठी सिक्रेट कोड ठेवण्यात आले होते. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याला ‘पंडोरा’ नाव देण्यात आले होते तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा मुक्काम असणाऱ्या हॉटेलला ‘समारा’ असे नाव दिले होते.
जगभरातील देशांच्या नेत्यांची सुरक्षा चोख ठेवणे, ही आव्हानात्मक जबाबदारी होती. तब्बल सहा महिन्यांपासून याची जय्यत तयारी सुरू होती. परदेशी पाहुण्यांची ओळख उघड होऊ नये, यासाठी त्यांच्यासाठी सुरक्षा कोडचा वापर करण्यात आला. जर वायरलेस सेटवर त्यांच्या येण्या-जाण्याबाबत कोणी त्यांच्याबाबत ऐकले तरी ही ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्ती कोठे जात आहे, हे कळू नये, यासाठी या सुरक्षा कोडचा वापर करण्यात आला. त्यामुळे केवळ व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच नव्हे तर, त्यांच्या हॉटेलपासून ते त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत सर्व ठिकाणांना कोड देण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
राजघाटाला ‘रुद्रपूर’ हे नाव देण्यात आले होते. प्रगती मैदानावरील कार्यक्रमस्थळाला ‘निकेतन’ हे नाव देण्यात आले होते. ली-मेरिडियन हॉटेलचे ‘महाबोधी’, तर ताजमानसिंह हॉटेलचे नाव ‘पॅरामाऊंट’ ठेवले होते. तसेच, वेगवेगळी हॉटेले आणि एअरफोर्स स्टेशन पालमलाही वेगवेगळे ‘कोड’ देण्यात आले होते. तसेच, परदेशी पाहुणे ज्या पर्यटनस्थळी फिरायला जातील, त्या ठिकाणांनाही वेगळी नावे देण्यात आली होती.
हे ही वाचा:
‘मोदीजी, आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा’
‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’
जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !
चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी या ‘कोड’ची माहिती रस्त्यावरील पोलिस आणि वाहतूक पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. रस्त्यातून निघणारा ताफा कोणाचा आहे, हेदेखील त्यांना सांगितले जात नव्हते. त्यांना केवळ विशिष्ट ‘कोड’ माहिती असायचा. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तो ताफा कोणाचा आहे आणि तो कुठे जात आहे, हे माहित असायचे.