महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या शाळेचे स्मारकात रुपांतर व्हावं अशी मागणी होत होती. हे प्रकरण न्यायालयात पोहचले होते. अखेर भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठीचा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला प्रश्न निकाली लागला आहे.
पुण्यातील भिडेवाडा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला पुणे महापालिका आणि सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच आता या शाळेचे स्मारकात रुपांतर होणार आहे. याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीनं पुढे आली होती. शाळा स्थापनेला १९९८ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्या वेळेपासून हे स्मारक करावे, या मागणीने जोर धरला होता.
हे ही वाचा:
नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!
मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!
पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले
रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण
भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिली आहे. त्यातील जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासाठी गेली २३ वर्षांपासून लढा दिला गेला.