प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि विखुरलेला कचरा यामुळे श्वास कोंडलेले समुद्रकिनारे कचरामुक्त करण्याची मोहीम ही आदर्श समाजसेवेचे उदाहरण मानले जाते. जागतिक जल दिवसाच्या निमित्ताने २२ मार्चला भाईंदर येथील बीचवर अशीच एक मोहीम राबविण्यात आली आणि त्या समुद्रकिनाऱ्याने मोकळा श्वास घेतला.
कारुळकर प्रतिष्ठानचा ५३ वा वर्धापनदिन आणि जागतिक जल दिनाचे औचित्य साधून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शुद्ध पाणी ही मानवाची गरज आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समुद्र कचरामुक्त करण्याच्या प्रयत्नांत आपलेही योगदान असावे यासाठी कारुळकर प्रतिष्ठानने या मोहिमेचे आयोजन केले. त्यांना फॉर फ्युचर इंडिया ऑर्गनायझेशन तसेच अभिनव विद्यामंदिरचा महत्त्वाचा हातभार लागला.
या मोहिमेत १५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वैलांकिनी बीचवरील या मोहिमेत ठिकठिकाणी जमलेला कचरा गोळा करून किनारा स्वच्छ केला गेला. काही तासांतच जवळपास १२ टन प्लॅस्टिक आणि इतर कचरा गोळा करण्यात आला. त्यासाठी जेसीबीही मागविण्यात आले होते. त्या मार्फतही किनाऱ्याची स्वच्छता केली गेली.
हे ही वाचा:
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
कोल्हापुरात भाजपाने केले शक्तिप्रदर्शन
केंद्रीय यंत्रणेच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेकडून वसुली?
नितेश राणेंनी मागितला उद्धव ठाकरेंचा राजीनामा! मनोहर जोशींची आठवण करून देत म्हणाले…
कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन सर्वांचा उत्साह वाढविला आणि नंतर सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. कारुळकर प्रतिष्ठानचे कर्मचारीही मोठ्या संख्येने या मोहिमेत उतरले होते. फॉर फ्युचर इंडिया ऑर्गनायझेशनचे हर्षद ढगे यांनीही या मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला. कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनीही या मोहिमेचे कौतुक केले.