छत्रपती संभाजीनगर येथे ‘दिशा उद्याची माध्यम आणि राजकारणाची’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुप्रसिद्ध पत्रकार आणि परखड समीक्षक भाऊ तोरसेकर यांनी विविध विषयांना स्पर्श करत आपल्या आगामी काळात कसे धाडसी वागावे लागेल, निर्भीड व्हावे लागेल, न्यूनगंड सोडावा लागेल याचा वस्तुपाठ घालून दिला. संभाजीनगरातील तापडिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाऊ तोरसेकरांसाठी आणि समविचारींना ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.
हिंदू धर्माच्या समर्थनार्थ हिंदू धर्मियांनी ठोस भूमिका घ्यायला हवी असे भाऊंनी ठासून सांगितले. ते म्हणाले की, हिंदू हा धर्म नाही तर ती एक जीवनशैली आहे. ज्या अर्थाने इतर धर्म मानले जातात तसे हिंदू धर्माचे नाही. इतर धर्म हे संघटनात्मक शक्ती आहेत. मला मठाधीश सांगू शकत नाही धर्म काय आहे ते. तिथे मात्र सगळे मठाधीश सांगतात उठाबशा कशा काढायच्या ते. देव ग्रेट आहे हे सांगण्याची गरज नसते. कारण तो ग्रेट असतोच. मी हनुमान, श्रीगणेश ग्रेट आहे हे म्हणत नाही. कारण तो ग्रेट आहे. मलाही माहीत आहे ते ग्रेट आहेत. पाच पाच वेळा शाली घालून तो ग्रेट आहे हे कौतुक करण्याची गरज नसते. ज्यावेळी समोरचा माणूस न्यूनगंड, अपराध गंड निर्माण करतो तेव्हा, हे दूध चांगले आहे कारण हिंदू म्हशीचे दूध आहे असा टोकाचा युक्तिवाद करावा लागेल. मी ग्रेट आहे कारण मी हिंदू आहे. जोपर्यंत तू दुसरा कुणी असशील तोपर्यंत मी ठासून हिंदू आहे. त्यातल्या गुणदोषांसकट. नो लॉजिक. हे करता आलं पाहिजे, अशा शब्दांत भाऊंनी आपली कणखर भूमिका मांडली.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाऊ तोरसेकर बोलत होते. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी, ऍनालायझर यूट्युब चॅनलचे सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, आकार डीजी ९चे प्रभाकर सूर्यवंशी, ओसीएमचे ओंकार चौधरी, सचिन पाटील, अक्षय बिक्कड, आबा माळकर यांनी या कार्यक्रमात आपल्या भूमिका मांडल्या. हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचारांचे पत्रकार, विचारवंत, प्रेक्षक वाचक या मेळाव्याला उपस्थित होते. सुशील कुलकर्णी यांनी गेले काही महिने या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. समविचारी मंडळींनी यानिमित्ताने एकत्र यावे यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला उपस्थितांनी दमदार दादही दिली. संपूर्ण सभागृह या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी खचाखच भरले होते. भाऊ तोरसेकर यांनीही सुशील कुलकर्णींचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले आणि आभारही मानले. असेच कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र करा अशी विनंतीही मग लोकांकडून कुलकर्णींना करण्यात आली.
भाऊ म्हणाले की, सुशील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला केतकी चितळे, अनंत करमुसे आणि स्वप्ना पाटकर यांना बोलवायचे का असे विचारले तर मी म्हटले की, जरूर बोलवा मर्दाची औलाद काय असते ते दाखवायचे होते. त्यात एक बाई आहे. रोज उठून मर्दाची औलाद, हिंमत असेल तर अशी भाषा बोलतात. पंजाबी ड्रेसमध्ये मर्द असतो हे दाखवायचे होते. हे दोघेजण आहेत ज्यांना भीती वाटत नाही.
भाऊ म्हणाले की, खरे तर, आम्ही मर्द आहोत हे सांगावं लागत नाही. १० दिवसांनी सत्तांतराला वर्ष होणार आहे. ३० जूनला. पण पितापुत्र खोक्यातून बाहेर पडायला तयार नाहीत. माणसं कोती असतात. घरात बसून राज्य सांभाळले म्हणतात. काय बोलतात हेच कळत नाही. स्वतःची टिंगल करतात. चूक मानली तर दुरुस्त करता येते. पण विचारवंत कधी चुकतच नाहीत. दिसत असतं सगळं पण आपण बघायला तयार नसू तर काय करणार. जे दिसतं ते बघत नाही म्हणून समस्या निर्माण होतात.
हे ही वाचा:
महिलांनी नऊवारीत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन!
चीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!
मणिपूरमध्ये कुटुंबाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी उचलले शस्त्र; बंकरमध्ये वास्तव्य
योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!
सहिष्णुता काय असते? भाऊंनी त्यासाठी उदाहरण सांगितलं की, रोममध्ये ग्रीकांच्या बुद्धिमंतांनी आपल्याच देवांची टिंगल केली. तेव्हा तिथल्या लोकांचा देवांवरचा विश्वास उडून गेला. रोमन कॅथलिकांची संख्या कमी होती तेव्हा त्यांना सहिष्णुता हवी होती. त्यांची ताकद वाढल्यावर उरलेल्या सर्व धर्मियांवर बंदी आणली. हा विषय गुंतागुंतीचे असतात. मला प्रश्न विचारला होता कुणीतरी की, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार असताना प्रतिगामी कसे लिहिता.
मी सांगितले की, डिसेंबर १९७२ महाराष्ट्र कॉलेजच्या इमारतीत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉची बोर्डाची बैठक होती. तीन तलाकला विरोध करण्यासाठी. हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर त्यावेळी तिथे होते. मीही होतो. आज तेच तीन तलाकचे समर्थन करतात. मग ते आज पुरोगामी आहेत आणि तेव्हा पुरोगामी नव्हते का? तुम्हाला प्रेशराईज केले जाते. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे म्हटले जाते. मग मी विचारतो तू का अपेक्षा बाळगतो? कशाला तू अपेक्षा बाळगली. मी बाळगली का तुझ्याकडून. माणूस गुंड नसतो, आपण भित्रे असतो. या मुलीने (केतकी चितळे) ते दाखवले. भित्रा कोण आहे, हे तिने दाखवून दिले. तिने संरक्षण मागितलेले नाही. नाही तर काही लोक जीवे मारण्याची धमकी, जीवे मारण्याची धमकी या कंठशोष करत आहेत. शिवसेनेच्या अवस्थेबद्दलही भाऊंनी खंत व्यक्त केली. पक्ष सांभाळता येत नाही तर महाराष्ट्र कसा सांभाळणार? ते विखरून पडताना वाईट वाटते. संघटना मोडकळीस जाते तेव्हा वाईट वाटतं.