एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याबरोबर ४० आमदारांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेला मोठे भगदाड पडले. शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. त्यानंतर या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या शिल्लक नेत्यांनी दिल्या. त्यामध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव हेदेदेखील होते. परंतु भास्कर जाधव यांनी एक विधान केलेय. ते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कदापीहीv चांगलं नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. या विधानाने उद्धव गटात अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.
ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान ज्या मातोश्रीवर २००४ मध्ये ताटकळत ठेवल्यानंतर अत्यंत भावनाविवश होऊन भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती. ते राष्ट्रवादीत गेले आणि भास्कर जाधव यांनी पुन्हा हातातल्या घड्याळ्याला जय महाराष्ट्र करत, पुन्हा एकदा शिवबंधन बांधून शिवसेनेत परतले. आज ते म्हणताहेत की मी राष्ट्रवादी सोडून चूक केली आहे. बहुतेक भास्कर जाधवांना पुढील भविष्य अंधकारमय आहे, असं वाटत असावं. त्यांना भविष्याची चिंता जडली असावी.
निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिला आहे. आता उद्धव ठाकरेंकडे ना शिवसेना नाव आहे ना धनुष्यबाण चिन्ह. खऱ्या शिवसेनेला हे चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहे. बहुतेक भास्कर जाधवांनी हे पुरतं ओळखल आहे. त्यांना असं वाटायला लागलं आहे, तेल ही गेले आणि उद्धव ठाकरेंच्या हाती फक्त धुपाटणे उरणार आहे, यांची पुरती जाणीव भास्कर जाधव यांना झाली आहे का? त्यानंतर खरी शिवसेना ही शिंदे यांची आहे म्हणत ठाकरे गटाचे अनेक समर्थक आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत. शिवसैनिक एकामागोमाग एक उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतोय. यामुळेच भास्कर जाधवांना चिंता वाटून त्यांनी हे विधान केले असेल असे वाटते.
भास्कर जाधव यांनी शिवसेनेची चलती असताना ते उद्धव ठाकरेंसोबत आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा निश्चितच भास्कर जाधव यांना आपला निर्णय योग्यच वाटला असेल. पण आज ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, ना शिवसेना नाव उद्धव ठाकरेंपाशी नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांना आपल्या वाट्याला काय येऊन पडेल, असे वाटू लागले असावे. ज्या शरद पवारांना राम राम ठोकून शिवसेनेत जाधव यांनी प्रवेश केला, त्यांचाच आधार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे बसले. रिमोट कंट्रोल चालवून शरद पवार शिवसेना संपवताहेत असा आरोप करत शिवसेनेचे आमदार बाहेर पडले.
भास्कर जाधव यांना २००४ साली शिवसेनेने उमेदवारी दिली नाही. त्याचा राग ठेवून त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला होता.
उद्धव ठाकरे यांना एकामागोमाग धक्के बसताहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरोग्यमंत्री होते. याआधी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाई नंतर सुभाष देसाईही शिंदे गटात जाऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले. एकेक करून बाळासाहेबांचे विश्वासू नेते, कार्यकर्ते बाहेर पडताहेत. पक्षातील गळती थांबता थांबत नाहीये. जर असेच सुरू राहिले तर पक्षात किती डोकी उरतील याविषयी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या उरलेल्या शिवसेनेत आपले नेमके काय स्थान असेल हा प्रश्न बहुतेक भास्कर जाधवांना पडलेला असावा. त्यातूनच हे विधान त्यांनी केले असावे.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी निधीवाटपात कसा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर अन्याय केला असे अजित पवार म्हणाले होते. तेव्हा फडणवीसांनी त्यांना आरसा दाखवताना त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन शिवसेनेला फक्त १५ टक्के निधी देण्यात आला होता आणि सगळ्यात जास्त वाटा हा राष्ट्रवादीने घेतला होता याची आठवण करून दिली. जास्त आमदार असतानाही शिवसेनेला तेव्हा १५ टक्के निधी आणि आमच्या सरकारमध्ये ४० आमदार असतानाही ३४ टक्के निधी असे फडणवीस म्हणाले. त्यावरूनही राष्ट्रवादीतच आपण सुखी राहिलो असतो असे तर जाधव यांना वाटले नाही ना. अशाच सुषमा अंधारेही राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी त्यांच्या पक्षात आल्या. उपनेत्या झाल्या. कदाचित येत्या काळात त्यांनाही राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, हे आपण आज किंवा उद्याही कबूल करू अशी उपरती होऊ शकते. कारण आजकाल त्यांचा भाषणातील तो जोर ओसरलेला वाटतोय.