तिबेट या प्रदेशाच्या मुक्तीसाठी आणि तिबेटियन नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या भारत तिबेट सहयोग मंच या संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे मुख्य मार्गदर्शक असणारे डॉ. इंद्रेश कुमार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. इंद्रेश कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सद्भावना दिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील मार्केटयार्ड परिसरातील गगन विहार सोसायटीत होणाऱ्या या रक्तदान शिबिराला पुण्याचे खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, उमेशकुमार देशमुख, मोहन बागमर, उल्काताई मोकासकार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारत तिबेट सहयोग मंच ही भारत आणि तिबेटच्या संबंधांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. तिबेटचे स्वातंत्र्य, कैलास मानसरोवरची मुक्तता आणि भारताची सुरक्षा या मुद्द्यांना घेऊन ही संस्था काम करते. चीनने बंदी बनवलेले तिबेटचे अकरावे पंचेन लामा आणि इतर नागरिकांच्या सुटकेसाठीही ही संघटना प्रयत्नशील आहे.