पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’

दिग्गजांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी व्ही नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामिनाथन यांना सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न

भारत सरकारने एकाच वेळी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. “देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही चौधरी चरण सिंग यांनी नेहमीच राष्ट्र उभारणीला चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. शेतकरी बंधू- भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा भारतरत्न देऊन सन्मान

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव गारू यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते ओळखले जातात अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

“नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्त्वपूर्ण उपायोजनांनी भरलेला आहे. ज्याने भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते. या योगदानाच्या जोरावर त्यांनी भारतात मोठे परिवर्तन तर घडवून आणलेच सोबतच सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

कृषितज्ज्ञ स्वामीनाथन यांच्या कार्याचा भारतरत्न देऊन गौरव

कृषितज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याबद्दल देखील पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट करून या पुरस्काराची माहिती दिली आहे. डॉ. एमएस स्वामीनाथन यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा..

“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”

हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

बंगालच्या तुरुंगातील कैदी राहताहेत गर्भवती; १९६ बालकांचा जन्म

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!

आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे कार्य त्यांनी केले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Exit mobile version