ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार

प्रदान प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रविवार, ३१ मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.

लालकृष्ण अडवाणींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रपतींनी शनिवार, ३० मार्च रोजी राष्ट्रपती भवनात चार व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला. नरसिंह राव यांचे पुत्र पी व्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि एम एस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपा संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते भाजपा आणि आरएसएसशी संबंधित असलेले तिसरे नेते आहेत.

हे ही वाचा :

काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना

फेब्रुवारी २०२४ मध्ये लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा झाली तेव्हा त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. अडवाणी म्हणाले की, “आज मला मिळालेला भारतरत्न मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केलेल्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषत: माझ्या प्रिय दिवंगत पत्नी कमला यांच्याबद्दल माझ्या मनापासून भावना व्यक्त करतो. त्या माझ्या जीवनातील शक्ती आणि स्थिरतेचा सर्वात मोठा स्त्रोत राहिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार आहेत. आपला महान भारत देश महानतेच्या आणि वैभवाच्या शिखरावर जावो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version