‘देशभक्ती’ हा डॉ.हेडगेवार यांचा स्थायीभाव होता असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित ‘साप्ताहिक विवेक’ च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ.हेडगेवार’ या विशेषांकाची निर्मिती साप्ताहिक विवेकतर्फे करण्यात आली आहे. या विशेषांकाचे प्रकाशन रा.स्व.संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते पार पडले. दिनांक २१ जून रोजी, डॉ.हेडगेवारांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना भैय्याजी जोशी यांनी डॉ.हेगेवारांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. डॉ.हेडगेवार जनजाती देशभक्त होते.त्यांच्या जीवनात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या गुणाचे प्रकटीकरण झाले होते. त्यांची देशभक्ती ही प्रासंगिक अथवा नैमित्तिक स्वरूपाची नव्हती. तर ‘देशभक्ती’ हा त्यांचा स्थायीभाव होता असे मत जोशी यांनी व्यक्त केले. डॉ.हेडगेवार यांचे जीवन अभ्यासाची आणि त्याची अनुसरण करायची गरजही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे कोणाला आमचा विरोध नाही आणि कोणी आमचे विरोधक नाहीत असे देखील भैय्याजींनी आपल्या भाषणात नमूद केले.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका
संजय राऊत हे शरद पवारांच्या पे रोलवर
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये पाठवणार
साप्ताहिक विवेकने प्रकाशित केलेल्या ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ.हेडगेवार’ या विशेषांकात आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांच्या निवडक ३३ अमृत वचनांचे ३३ लेखकांनी विवेचन केले आहे. या प्रकाशन सोहळ्याला रा.स्व. संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ.सतीश मोढ, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, ‘साप्ताहिक विवेक’ आणि ‘मुंबई तरुण भारत’ चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर उपस्थित होते.