कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे मुंबईतील बेस्टने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची मदत मागितली. त्याप्रमाणे मुंबईत काही महिने या एसटीच्या बसेस धावत होत्या मात्र त्या १४ जूनला या बसेसची सेवा बंद करण्यात आल्यानंतर आता त्यांचे ७० कोटी रुपये बेस्टने एसटीला देणे अपेक्षित आहे. आधीच कर्जाच्या बोज्याखाली दबलेली एसटी या ७० कोटीच्या भाराखाली आणखी दबली जाणार आहे.
कोरोना महामारीत बेस्टने एमएसआरटीसीच्या वाहनांचा वापर केलेला होता. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणतात की, बेस्ट हीदेखील सरकारी कंपनी आहे. आम्हाला खात्री आहे की, हे ७० कोटी आम्हाला मिळतील. कारण नुकतीच आम्ही ही सेवा त्यांच्या विनंतीनुसार बंद केली आहे.
हे ही वाचा :
तिरंदाजी विश्वचषक: अभिषेक वर्माचा सुवर्णवेध
रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?
इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय
मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही
यासंदर्भात बेस्टचे अधिकारी म्हणतात की, काही महिन्यांपूर्वी बेस्टने एसटीकडून मिळणाऱ्या सेवेबद्दल माहिती घेतली होती. त्यासाठी येणारा खर्च, किती प्रवास त्या करणार, दर काय असणार अशी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली होती.
रेल्वे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यावेळी महामंडळाने सुरवातीला १०० बसेस बेस्टला दिल्या. त्यानंतर मागणी वाढल्यानंतर जवळपास हजार बस देण्यात आल्या. ७५ रुपये प्रति किमी दराने महामंडळाने बेस्टला या बसेस देऊ केल्या. यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर सुद्धा महामंडळानेच व्यवस्था करुन दिली. महामंडळाने दिलेल्या या बसचा दिवसाचा खर्च हा १ कोटीच्या घरात होता. त्यामुळेच आता बेस्टकडून महामंडळाला जवळपास ७० कोटींचे देणे लागू आहे. बेस्ट आणि रस्ते वाहतूक महामंडळ या दोन्ही संस्था तोट्यातच आहेत. त्यामुळे आता हा पैसा कसा दिला जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.