‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!

‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!

कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या बेस्ट आणि एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सध्या हालाखीची आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळत नसून काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले. बेस्ट उपक्रमही तोट्यातच असून आता बेस्टने त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एक अजब निर्णय घेतला आहे. बेस्ट आता आपले चालक खासगी कंपन्या, सरकारी संस्था आणि शासकीय प्राधिकरण यांना भाड्याने चालक उपलब्ध करून देणार असून प्रत्येक चालकामागे प्रतिदिन ९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकाला मात्र बेस्टमधील कामगार संघटनांनी विरोध केला आहे. उपक्रमाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून प्रत्येक आगारात १२ ऑक्टोबरला निदर्शने करण्यात येणार आहेत. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही समितीकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?

रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक

वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीवर एनसीबीचे छापे! हजर राहण्याचे समन्स

तत्कालीन मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, तत्कालीन बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि बेस्ट वर्कर्स युनियन यांच्यात २०१९ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. यामध्ये बेस्टने स्वमालकीच्या २,३३७ बसगाड्या राखण्याचे मान्य करून भंगारात निघणाऱ्या बसगाड्या लक्षात घेता नवीन बस विकत घेण्यासाठी पालिकेने प्रत्येक बससाठी पैसे देण्याचे मान्य केले होते. मात्र अद्यापही असा कोणताही प्रस्ताव बेस्टकडून पालिकेकडे गेलेला नाही. त्यामुळे बेस्टच्या मालकीच्या बस १,८०० हून कमी झाल्या आहेत. बेस्टमध्ये १:९ असे बस आणि कर्मचारी यांचे प्रमाण राखले जाते. सध्या बेस्ट परिवहन विभागाकडे २३,००० कर्मचारी आणि १,८०० बस आहेत. त्यामुळे ७,५०० कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत.

गेल्या वर्षी बेस्टला १,८८७ कोटी रुपये तोटा होता. शुक्रवारी बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी २०२२- २३ चा अर्थसंकल्प अंदाज सादर केला. यात परिवहन विभागाचे उत्पन्न १,४५१ कोटी ६७ लाख रुपये दाखविण्यात आले आणि ३,५६२ कोटी १४ लाख रुपये खर्च आहे. ‘बेस्ट उपक्रमाकडे सध्या आठ हजार चालक असून त्यातील १,३०० चालकांना काम नाही. त्यामुळे या कुशल चालकांचा योग्य वापर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यात काही गैर नाही,’ असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Exit mobile version