सुमारे १८ वर्षांपासून डोक्यात ३-सेंमी लांबीची गोळी घेऊन जगत असलेल्या येमेन येथील तरुणावर बेंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्याच्या डोक्यातून धातूची गोळी बाहेर काढण्यात आली.२९ वर्षीय तरुणाच्या डाव्या टेम्पोरल हाडात ही गोळी खोलवर घुसली होती.त्यामुळे तरुणाला तीव्र डोकेदुखी आणि सतत कानातून रक्तस्राव होत होता.
तरुणाचे नाव सालेह( नाव बदलले आहे) असे आहे. सहा भाऊ आणि तीन बहिणी सोबत सालेह आपल्या येमेनमधील एका गावात वाढला.त्याचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती.वडील शेतकरी असल्याने सालेह आपल्या वडिलांना मदत म्हणून शेतातील झाडांना पाणी घालणे आणि खत घालणे असे काम करत असे.परंतु वयाच्या १०व्या वर्षी सालेहचे आयुष्य बदलले.सालेह आपल्या गावातील एका दुकानातून घरी परतत असताना दोन गटात चालू असलेल्या भांडणात तो अडकला.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सालेह म्हणाला की, दुपारची वेळ होती.मी दोन गटातील भांडणात अडकलो आणि अचानक मला गंभीर दुखापत झाली आणि खूप रक्तस्त्राव झाला.मला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, त्यांनी फक्त जखम साफ केली पण गोळी काढण्याची तसदी घेतली नाही, असे सालेह म्हणाला.
गोळी कानात घुसल्याने कानाचे प्रवेशद्वार अरुंद झाले होते.त्यामुळे रक्तस्त्राव होत होता. गोळी अर्धवट कानाच्या पॅसेजमध्ये बाहेर होती आणि गोळीचे टोक आतील हाडात अडकले होते, ज्यामुळे जखम भरून येत नव्हती.गोळी कानात असल्यामुळे कानात पस जमा होऊ लागला आणि कालांतराने डोकेदुखी सुरु झाली.सालेहने सांगितले की, मला माझ्या काही मित्रांकडून बेंगळुरूच्या ॲस्टर हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली आणि मोठ्या आशेने मी बेंगळुरू शहरात आल्याचे त्याने सांगितले.
हे ही वाचा :
तीन तलाक, सेंट्रल व्हिस्टा… मोदी सरकारच्या सात निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाचीही मोहोर!
आरएसएस मुख्यालयाला प्रणब मुखर्जी यांनी भेट दिली तेव्हा…
कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
पंरतु ॲस्टर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ही शस्त्रक्रिया अवघड वाटली.कारण गोळी त्याच्या कानात डाव्या बाजूच्या टेम्पोरल हाडाच्या आत खोलवर होती, त्यामुळे शस्त्रक्रिया करणे एक आव्हानात्मक होते.ॲस्टर हॉस्पिटलचे डॉ रोहित उदय प्रसाद म्हणाले की, गोळी आतमध्ये होत, ती बाहेर काढल्यानंतर रुग्णाच्या कानातून मोठा रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्जिकल टीमने गोळीशी संबंधित रक्तवाहिन्यांचे स्थान शोधण्यासाठी एमआरआयऐवजी कॉन्ट्रास्ट सीटी अँजिओग्राफी करणे निवडले. “आम्ही मूलभूत द्विमितीय एक्स-रे वापरला ज्याद्वारे आम्हाला बुलेटचे अचूक स्थान सापडले,” असे डॉ प्रसाद म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आम्ही बारकाईने शस्त्रक्रिया केली आणि आम्हाला त्यात यश आले.रुग्णाच्या कानातून रक्तस्त्राव होण्याचा धोका होता परंतु तसे काही झाले नाही.तसेच आमची संपूर्ण टीम कोणत्याही परिस्थितीसाठी तयार होती, असे डॉ प्रसाद यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या वेदना कमी झाल्या आहेत.तसेच त्याला थोडे ऐकायला येत आहे आणि कानातून रक्तस्रावही थांबला आहे.सालेह शस्त्रक्रियेनंतर येमेनला परतला आणि आता तो बरा आहे.तो सध्या इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये पदवी घेत आहे.सालेह आपल्या मायदेशी येमेनला परत जात असताना विमानतळावर अटक होईल या भीतीने त्याच्या डोक्यातून काढण्यात आलेली गोळी तो इथेच सोडून गेला आहे.