रशिया विरुद्ध बेल्जियमचा सोपा विजय

रशिया विरुद्ध बेल्जियमचा सोपा विजय

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात बेल्जियमने रशियावर सहज विजय मिळवला आहे. बेल्जियम संघाने तीन गोल नोंदवत मॅच आपल्या खिशात टाकली. विशेष म्हणजे बेल्जियम संघामध्ये अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. पण आपल्या बऱ्याच स्टार खेळाडूंना मैदानातही न उतरवता बेल्जियमने ही विजयी सलामी दिली आहे.

ग्रुप बी मधील बेल्जियम आणि रशिया सामना हा पहिल्या मिनिटापासूनच एक तर्फी होताना दिसला. बेल्जियम अटॅक आणि डिफेन्स दोन्हीकडे शक्तिशाली दिसत होते. रशियाकडून मात्र केवळ आर्टेम झ्युबा हाच अटॅक करताना दिसत होता. रशियाचा डिफेन्सही बेल्जियम समोर सपशेल अपयशी ठरताना दिसत होता. सामन्याच्या १० व्या मिनिटातच बेल्जियमकडून रोमेलू लुकाकु याने रशियन डिफेन्सला चकवत गोल केला.या नंतर सामन्याच्या ३४ व्या मिनिटात थोरांग हजार्ड याने पेनल्टी बॉक्स च्या बाहेरून गोल करण्याचा प्रयत्न केला पण रशियाच्या गोलकीपरने तो गोल होऊ दिला नाही. परंतु त्याला बॉल देखील आपल्याकडे ठेवता आला नाही आणि थॉमस मुनियर याने त्याचा फायदा उचलत गोल केला. या गोलमुळे बेल्जियमला २-० अशी बढत मिळाली.

हे ही वाचा:

डेन्मार्कला नमवत फिनलँडचा ऐतिहासिक विजय

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स आठवा सामनाही अनिर्णीत

डेन्मार्क – फिनलँडचा सामना पुन्हा सुरु

सामन्याचा दुसरा हाफ सुरू झाला आणि रशियन संघ सामन्यात परत यायची तयारी करत आहे असे दिसले. मात्र बेल्जियम डिफेन्स आणि बेल्जियमचा गोलकीपर थिबाॅ कौर्ट्वा याने रशियन अटॅकचे सगळे प्रयत्न धुळीस मिळवले. ८८ व्या मिनिटात लुकाकूने अजून एक गोल करत सामन्यात ३-० अशी आघाडी घेतली आणि बेल्जियम संघाचा विजय निश्चित केला. सामना संपल्यावर लूकाकुने क्रिस्चन एरिक्सनला संबोधून एक संदेशही दिला. लूकाकु आणि एरिक्सन हे एकाच इटलीच्या इंटर मिलान या क्लबकडून खेळतात. बेल्जियमच्या सामन्याआधी पार पडलेल्या डेन्मार्क विरुद्ध फिनलँड या सामन्यादरम्यान एरिक्सन मैदानात अचानक कोसळला. यामुळे सारेच जण चिंतेत होते. पण थोड्या वेळाने तो शुद्धीत आल्याची आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली.

बेल्जियम विरुद्ध रशिया असा जरी सामना असला तरी यामध्ये अजून एक सामना २ खेळाडूंमध्ये होता. बेल्जियमचा रोमलू लुकाकू आणि रशियाचा आर्टेम झ्यूबा. दोघांचीही उंची ६ फुटापेक्षा जास्त, दोघेही पिळदार दंड असणारे आणि आपापल्या देशांसाठी महत्वाचे खेळाडू, पण हा सामना लुकाकूने पहिल्या १० मिनिटातच जिंकला.

रविवार, १३ जून रोजी आता युरो कप स्पर्धेत वीकेंड धमाका पाहायला मिळणार आहे. इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता), ऑस्ट्रिया विरुद्ध नॉर्थ मेसेडोनिया (भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता) आणि नेदरलँडस् विरुद्ध युक्रेन (भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजता) असे सामने होणार आहेत.

Exit mobile version