दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानींच्या नाकावर टिच्चून तेथील एका महिलेने आयआयटी पदवीधर होण्याची किमया केली आहे. या २६ वर्षीय मुलीचे नाव आहे बेहिश्ता खैरुद्दीन. बेहिश्ता खैरुद्दीनने प्रयोगशाळेतील काचपात्र उसने घेऊन, तिच्या बहिणीच्या मायक्रोवेव्ह ओव्हनवर प्रयोग करून, दोन वर्षे अस्थिर वाय-फाय कनेक्शचा सामना करून कम्प्युटरवर रासायनिक अभियांत्रिकीचा अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
सन २०२१मध्ये अफगाणिस्तानची सत्ता काबीज करताना तालिबानींनी महिलांना शाळा आणि विद्यापीठांमध्ये बंदी घातली. त्याचवेळी बेहिश्ता हिने आयआयटी-मद्रासमध्ये रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. उत्तर अफगाणिस्तानात राहणाऱ्या बेहिश्तासाठी आयआयटी-मद्रासने तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. बेहिश्ताचा पर्शियन भाषेत अर्थ होतो, ‘स्वर्ग’. तिच्या देशात आजही काही महिला कल्पनाही करू शकत नाहीत, अशी कामगिरी बेहिश्ताने करून दाखली आहे.
बेहिश्ता हिने मूलतत्त्ववादी राजवटीच्या प्रतिगामी विचारांवर कडाडून टीका केली. “मला स्वतःबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. तुम्ही मला थांबवले तर मी दुसरा मार्ग शोधेन. मला तुमच्याबद्दल (तालिबान) वाईट वाटते कारण तुमच्याकडे शक्ती आहे, तुमच्याकडे सर्व काही आहे, पण तुम्ही त्याचा वापर करत नाही. त्यामुळे दिलगिरी तुम्ही व्यक्त केली पाहिजे, मी नाही,’ असे ती म्हणाली.
अफगाणिस्तानमधील विद्यापीठामधून बी. टेक केल्यानंतर सन २०२१मध्ये बेहिश्ताने केमिकल इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशाच्या इच्छेने आयआयटी-मद्रासमध्ये मुलाखत दिली. त्यात तिची निवड करण्यात आली. मात्र त्याच सुमारास तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ती उत्तर अफगाणिस्तानमधील तिच्या घरी अडकून पडली.
‘मला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ‘आयसीसीआर’कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. (आयसीसीआर अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते) पोर्टलवरील माझे खाते निष्क्रिय करण्यात आले. अखेर माझा संपर्क आयआयआयटी मद्रासमधील प्राध्यापक रघु (रघुनाथन रेंगासामी) यांच्याशी झाला. मी त्यांना ईमेलद्वारे सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी मला शिष्यवृत्ती दिली आणि एक महिन्यानंतर मी माझा अभ्यास सुरू केला,’ असे बेहिश्ताने सांगितले.
हे ही वाचा:
‘चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून सेंगोलचा वापर झाला होता’!
म्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !…माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘संग्रहालयांची बात’
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा योग जुळून आला
प्रचंड मेहनत करीत घरी बसून दूरस्थ पद्धतीने तिने शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी तिने काचपात्रेही उसनी घेतली. बहिणीच्या मायक्रोव्हेव्ह ओव्हनच्या मदतीने घरातच आवश्यक प्रयोग केले. रात्री केवळ चार ते पाच तास विश्रांती घेत तिने कम्प्युटरच्या साह्याने अभ्यास करून यशाला गवसणी घातली. तिने अफगाणिस्तानमधील विद्यापीठातून बीटेक केले. तिचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. तिचे वडील सामाजिक विज्ञानमधील पदवीधर आहेत, तिची आई डॉक्टर आहे. मोठी बहीण आयआयटी पीएचडीची विद्यार्थिनी आहे, तीही अफगाणिस्तानमध्ये अडकली आहे. तर, दुसऱ्या बहिणीने कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
एका भावाने सामाजिक शास्त्राचा अभ्यास केला आहे. बेहिश्ता अस्खलित इंग्रजी बोलते, ही भाषा ती स्वत: ऑनलाइन शिकली आहे. भविष्यात तिला नोकरी करायची नाही, तर शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे आहे. अफगाणिस्तानात शिक्षण पद्धतीची गरज भासू शकते. ‘मी आयआयटी-मद्रासचे उच्च दर्जाचे शिक्षण पाहिले आहे. नवीन सरकारने परवानगी दिल्यास मला अशा प्रकारचे शिक्षण माझ्या देशात आणायचे आहे,’ अशी बेहिष्ताची इच्छा आहे.