भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरूवात

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरूवात

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चे उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील साबरमती आश्रम येथून केले. त्याबरोबरच नरेंद्र मोदींनी आज दांडी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

महात्मा गांधींनी १२ मार्च १९३० रोजी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यासाठी पदयात्रा काढली होती. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन साबरमती आश्रमातून करण्यात आले. या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीते, नृत्ये सादर करण्यात आली.

हे ही वाचा:

धार्मिक स्थळांच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांवर योगींचा दणका

शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापूंना वंदन केले. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना देखील नमन केले. स्वातंत्र्यलढ्यातून आपल्याला आजही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रिडम स्ट्रगल, आयडियाज् ऍट ७५, अचिव्हमेंट ऍट ७५, ऍक्शन्स ऍण्ड रिसॉल्व्ज ऍट ७५ हे स्वातंत्र्यलढाचे पाच स्तंभ असून भारताला आजही यांच्यापासून प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोदींनी मीठाच्या सत्याग्रहाचे उदाहरण देऊन, पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेवर भर दिला. त्याबरोबरच भारताच्या अमृत महोत्सवाची सुरूवात १५ ऑगस्ट २०२२ च्या ७५ आठवडे आधी करण्यात येऊन १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत हा महोत्सव चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजपासून प्रारंभ होत असलेल्या दांडी यात्रेच्या ७५ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे नेतृत्व केंद्रिय राज्यमंत्री प्रलहाद सिंग पटेल करणार आहेत. एकूण २४१ मैल लांबीच्या यात्रेची सांगता २५ दिवसांनी ५ एप्रिल रोजी होणार आहे. या यात्रेत ८१ पदयात्रींचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, अहमदाबादचे महापौर किरिट भाई परमार, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, साबरमती ट्रस्टचे कार्तिकेय साराभाई आणि ट्रस्टचे जुने कार्यकर्ते अमृत मोदी हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version