शाईस्तेखान, कारतलबखान, इनायतखान, नामदारखान, जसवंतसिंग राठोड, भावसिंग या सगळ्यांची जिलबी शिवाजी महाराजांच्या भवानीखाली मारली गेली. वरून चार दिवस अत्यंत शांतपणे दार-उल-हज उर्फ सुरत साफ करून मुघलांची उरली सुरली अब्रू जगभरात जाहीरपणे वाळत घातली. औरंगजेब संतापला. सुरत लुटावी इतकी एकट्या शिवाजीराजांची हिंमत नाही त्याला विजापूर आणि कुत्बशाहाची मदत आणि फूस असेल. औरंगजेबाने सुरतेच्या लुटीत शिवाजी महाराजांना फूस लावल्याचा आरोप करणं या दोन्ही शाह्यांना भरपाई मागणारी धमकी देणारी पत्रे पाठवली पण त्याचा काही फायदा झाला नाही. संतापाच्या भरात औरंगजेब स्वतः स्वारीवर निघाला. पण बहुदा अफझलखानाचे पोट आणि शाईस्तेखानाची बोटे त्याला आठवल्याने त्याने मथुरेवरून माघार घेतली.
मागील भागांसाठी क्लिक करा:
१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)
२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)
३. औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)
पण कम्बख्त मरहट्ट्यांवर पाठवायचे कुणाला? अखेर एक तोलामोलाचा माणूस निवडला – मिर्झा राजा जयसिंग. विजापूरपासून बल्खपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी आपली तलवार गाजवली. त्याने मिर्झा राजा जयसिंगाची नेमणूक दख्खनच्या मोहिमेवर केली. शिवाजीराजे आणि विजापूर दोहोंना वठणीवर आणा. ३० सप्टेंबर १६६४ रोजी मिर्झा राजा निघाले. १० फेब्रुवारी १६६५ रोजी ते औरंगाबादेस पोहोचले. त्यांनी स्वराज्याच्या विविध आघाड्यांवर आपली लहान-मोठी पथके पाठविली. सर्वत्र चकमकी सुरु झाल्या. रयत परागंदा होऊ लागली. मुघलांनी स्वराज्याला सर्व बाजूंनी घेरून टाकले प्रचंड नासाडी सुरु झाली. अखेर पुरंदरच्या प्रदीर्घ लढ्यानंतर महाराजांनी १३ जून १६६५ रोजी तह केला व आपल्याकडील तेवीस किल्ले आणि चार लाख होनांचा मुलुख मुघलांना द्यावे लागले. वरून विजापूर विरुद्धच्या लढाईत मुघलांना सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पण विजापूर वरील स्वारीत भलतेच घडले मराठे आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजेचा मोठा पराभव झाला. या पराभवाचे खापर दिलेरखानाने शिवाजी महाराजांवर फोडले. तो महाराजांचा खून करायची भाषा बोलू लागला. याचवेळी महाराजांनी पन्हाळा जिंकण्यासाठी रवाना होण्याची परवानगी मागितली. परिस्थिती पाहून मिर्झाराजांनाही ही चांगली संधी दिसली. महाराज पन्हाळ्याला पोहोचले आणि हल्ला चढवला तिथेही पराभव पदरी आला. हजारभर मावळे कामी आले. नेतोजी पालकर वेळेवर हजर न झाल्याने त्यांना शिवाजी महाराजांनी सेनापती पदावरून काढून टाकले. नेतोजी थेट विजापूरला जाऊन सामील झाले. याच वेळी कुत्बशहाने विजापूरच्या मदतीला पन्नास हजार सैन्य पाठवले. सर्वत्र मुघलांच्या पराभवाच्या बातम्या येऊ लागल्या. मिर्झाराजे कपाळावर हात धरून बसले.
मागील भागांसाठी क्लिक करा:
४. औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)
५. औरंगजेब दिल्लीची सत्ता बळकावतो (भाग ५)
६. औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)
याक्षणी जर नेतोजीप्रमाणे खुद्द शिवाजीराजे जाऊन विजापूरला जाऊन मिळाले तर सगळाच डाव उधळला जाईल. शिवाजीराजांना इथून दूर ठेवायला हवे पण त्यांच्यावर नियंत्रणही हवे. काय करायचे? अखेर शिवाजी महाराजांनी दिल्लीस जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी म्हणून मिर्झा राजे जबरदस्ती महाराजांच्या गळ्यात पडले. दुसरीकडे शिवाजीराजांना दिल्लीत बोलावून घ्या म्हणून दिल्लीला पत्रांवर पत्रे पाठविणे सुरु केले. या काळात अत्यंत महत्वाची घटना आग्र्यात घडली. कण-कण झिजणाऱ्या आणि झुरणाऱ्या शहाजहानने अखेर डोळे मिटले. वास्तविक ते आधीच मिटायला हवे होते कारण एका उल्लेखानुसार औरंगजेबाने दोन वेळा शहाजहानवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला पण शहाजहानशी एकनिष्ठ असलेल्या सेवेकऱ्यांनी विष घातलेले पदार्थ स्वतः रिचवले आणि शहाजहान वाचला. भाऊ, पुतणे वगैरे एकूण छत्तीस लोकांचा निकाल लावून सत्तेवर आलेल्या औरंगजेबाचे मन कायम शंकेने पोखरलेले होते कि शाहजहानाने जर बंड घडवून आणले तर? म्हणून मुघली परंपरेला जागून बापाच्या जीवावर उठण्याचे अत्यंत उच्च विचार त्याच्या मनात येऊ लागले. पण दुसरीकडे एक गंमत अशी वाचायला मिळते कि बहिणीला मध्यस्थ बनवून “मी औरंगजेबाला त्याच्या सर्व कृत्यांबद्दल माफ केले आहे!” असे जाहीर करणारे पत्र शहाजहानकडून मिळविण्याचा तो प्रयत्न करीत होता. कारण? याचे कारण मेल्यावर कयामतच्या दिवशी अल्लासमोर उभे राहताना त्याला “तू बापाला छळलेस” असा आरोप नको होता. म्हणून हे माफीचे पत्र हवे होते जणू काही शेवटी ते पत्र घेऊन तो थडग्यात जाणार होता. शहाजहान पण खट म्हातारा होता. तब्बल सहा महिने त्याने दाद लागू दिली नाही उलट अनेक आरोप करणारी पत्रेच पाठवत राहिला. अखेर सहा महिन्यांनी मुलीच्या आग्रहाला बळी पडून त्याने तसे पत्र लिहून दिले. तोच शहाजहान आता वारला होता. त्याला ताजमहालाच्या तळघरात मुमताज महलच्या शेजारी पुरण्यात आले. सत्तेवर आल्यानंतर पहिली दहा वर्षे फारसा आग्र्याला न फिरकलेला औरंगजेब आता आपले चंबूगबाळे घेऊन आग्र्यालाच ठाण मांडून बसला.
मागील भागांसाठी क्लिक करा:
७. औरंगजेब झाला बद ‘सुरत’ (भाग ७)
आग्र्याहून त्याने पत्र पाठविले – “शिवाजीराजे भोसले यांना आग्र्यास पाठवावे आम्ही त्यांचा इंतजाम करीत आहोत!” लगोलग त्याने शाही खजिन्यातून एक लाख रुपये खर्च करून महाराजांच्या प्रवासाची व्यवस्था केली. हुकूम सुटले कि शिवाजीराजे भोसले आग्र्यास येत असून आपल्या मामलती मधून पार होतील. त्यांची व्यवस्था राजपुत्राप्रमाणे करावी. त्यांना त्रास होऊ देऊ नये. स्वराज्याची सर्व व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे लावून नऊ वर्षांचे शंभूराजे आणि विश्वासातील फक्त साडेतीनशे माणसांसहित दिनांक ५ मार्च १६६६ रोजी महाराज आग्र्यास निघाले. औरंगाबादमार्गे ते ११ मे १६६६ रोजी आग्र्यात पोहोचले. इथे महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी मिर्झाराजांनी आपला पुत्र रामसिंगावर सोपवली होती. रामसिंग नेमका या दिवशी महालातील पहारे बसविण्यात गुंतला होता. त्याने महाराजांचे स्वागत करायला आपला कारकून मुन्शी गिरिधारीलाल याला पाठविले. आग्र्यात झालेला हा महाराजांचा पहिला अपमान. पण महाराजांनी डोक्यावर बर्फ ठेवला. शांत राहिले. दुसऱ्या दिवशी बादशहाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा विशेष दरबार भरणार होता तिथे जातानाही निरोप आणि रस्ते दोन्हींची चुकामुक झाली. ऐन मे महिन्याच्या दिवसात आग्र्याच्या भाजून काढणाऱ्या उन्हात आग्र्याच्या एका रस्त्यातून दुसऱ्या रस्त्यात बराच काळ फिरत राहावे लागले. या सगळ्यात दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास दोन्ही दरबार संपले. पुढला दरबार घुशलखान्यात भरला.
आग्र्याच्या बलदंड किल्यात प्रवेश करून महाराज व शंभुराजांना घेऊन अखेर रामसिंग घुशलखान्यात आला. शिवाजीराजे आले आहेत हे बघून एरवी शांत असलेल्या दरबारात कुजबुज झाली. बंडखोर सीवा भोसला तो हाच. नबाब शाईस्तेखानाची बोटे छाटणारा, सुरत मारणारा हाच तो भयंकर माणूस! रामसिंगाने महाराजांना आणि शंभुराजांना तख्तापुढे नेले. दरबारी रिवाजानुसार बादशहाच्या परवानगीशिवाय थेट बादशहाशी बोलायचे नाही. जे काही संभाषण असेल ते बक्षीमार्फत करायचे. एरवी हात बांधून नजर खाली घालून उभे राहायचे. महाराज आणि शंभूराजे तख्तासमोर आले त्यांनी नजराणे आणि काही रोख रक्कम नजर केली आणि बादशहाला तीनवेळा मुजरा केला. औरंगजेबाने एकही शब्द उच्चारला नाही किंवा त्याने चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाहीत. मग दोघांना पाच हजारी मानसबदारांच्या रांगेत नेऊन उभे केले. इथून बादशहा जेमतेम अंगठ्याइतका दिसत होता.
अपमान! जीवघेणा अपमान! महाराजांच्या मस्तकाची नस तडकली आणि त्या दिवसापर्यंत न घडलेली घटना आग्रा दरबारात घडली. वीज कडाडावी तसा महाराजांचा आवाज त्या शांत दरबाराला चिरत गेला. “रामसिंग! हमारे सामने यह कौन खडा है?” दरबारात धरणीकंप झाला. “माझ्या सैन्याने युद्धात ज्यांची पाठ बघितली अशी जसवंतसिंगासारखी लोकं दरबारात माझ्या पुढे? नको तुझी खिल्लत माझे मुंडके मारले तरी बेहत्तर.” महाराजांनी शंभूराजांचा हात धरला आणि बादशहाला पाठ दाखवून ते दरबारातून बाहेर पडले. हे असे काही आग्रा दरबारात मुघलांच्या इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटचे घडले. औरंगजेब आणि शिवाजी महाराजांची ती भेट देखील पहिली आणि शेवटची.
मग काही लोकं म्हणजे वजीर जाफरखान, जसवंतसिंग आणि जहानआरा हे तिघे औरंगजेबाच्या कानाला लागले- “सीवा भोसलेला कत्ल करा”. या तिघांना महाराजांचा द्वेष करण्याची सबळ कारणे देखील होती वजीर जाफरखान हा शाईस्तेखानाच्या बहिणीचा नवरा होता, जसवंतसिंगाच्या मनात कोंडाण्याचा पायथ्याशी झालेला पराभव आणि दरबारातील चार दिवसांपूर्वी झालेला अपमान झोंबत होता, तर जहानआराची जहाजे ज्यांना “साहेबी” म्हणत ती दार-उल-हज म्हणजे सुरत मधून व्यापार करीत तसेच तिला सुरतच्या उत्पन्नातील वाटा मिळे. शिवाजी महाराजांनी सुरत धुवून स्वच्छ केली म्हटल्यावर तिचा पारा चढला होता. औरंगजेबाने दहा-बारा दिवसांनी महाराजांवर पहारे बसवायचा हुकूम दिला.
पुढील इतिहास आपण जाणतोच. शिवाजी महाराजांनी आधी एक एक करून आपली सगळी माणसे, हत्ती – घोडे, पालख्या, आणि सोबत आणलेला पैसा दख्खनमध्ये परत पाठवला आणि मग एके दिवशी शंभूराजांसहित तेच गायब झाले. कुठे गेले? जमिनीत गडप झाले? कि जादूचा गुटखा खाऊन स्वतः हवा झाले? तौबा तौबा तरी सांगितलं होतं सीवा भोसला खूप खतरनाक माणूस त्याला चेटूक येते. १७ ऑगस्ट १६६६ महाराज आग्र्याहून निसटले. प्रचंड शोधाशोध झाली. पण मागे उरलेली दोन-तीन माणसे सोडून हाती काहीच लागले नाही ती देखील महाराजांनी खंडणी भरून सोडवून घेतली. आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाची ऐन राजधानीतच फजिती झाली. बाराशे मैलांवरून येऊन शिवाजीराजांनी त्याच्या दरबारात त्याच्या उपस्थितीत आवाज चढवला, तो बसला असताना सिंहासनाला पाठ दाखवली, आणि खुद्द औरंगजेबाने ठेवलेल्या पहाऱ्यातून ते निसटून गेले आणि औरंगजेब काहीही करू शकला नाही. मागे उरला तो केवळ त्याचा निष्फळ संताप. तो राग त्याने रामसिंगावर आणि मिर्झा राजांवर काढला. रामसिंगची मनसब कमी करून त्याची बदली ढाक्याला केली तर मिर्झाराजांवर विषप्रयोग केला.
आता औरंगजेब पिसाळला त्याने पुढील दोन वर्षे शब्दशः वेडाचे झटके यावेत तसे अनेक धार्मिक फतवे काढले. हिंदूंवर जिझिया लादला. वरून हिंदू व्यापारांवर ५% अधिकचा कर लावला. हिंदूंना जत्रा भरविण्यास बंदी केली. होळी-दिवाळी वगैरे सण शहराच्या बाहेर जाऊन साजरे करण्याचा हुकूम निघाला. १६६९ मध्ये काढलेल्या फतव्यामुळे काशीविश्वनाथ, मथुरेचे केशवदेवराय आणि सोमनाथाचे मंदिर उध्वस्त केले. देशभरातील कोट्यावधी हिंदूंच्या काळजालाच त्याने धक्का लावला. ही मंदिरे पाडून त्याने तिथे मशिदी उभ्या करण्याचे आदेश दिले. आता स्थानिक हिंदू लहान-लहान बंड करू लागले. हिंदु- मुसलमानांतील दरी कित्येक पटींनी वाढली. आणि औरंगजेबाच्या धर्मांधतेमुळे यापुढे ती दिवसेंदिवस वाढतच जाणार होती.
(क्रमशः)
संदर्भ –
१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार
२) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल
३) मुसलमानी रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई
४) स्टोरिआ दो मोंगोर- निकोलाओ मनुची
५) शककर्ते शिवराय
६) राजा शिवछत्रपती.