ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेतही आघाडी घेतली आहे. त्यांच्या या दमदार कामगिरीनंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर नाराज आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी लंडनमधील काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे समोर आले आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मागील मंगळवारी रवी शास्त्री गेले असता त्यानंतर काही दिवसांतच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
रवी शास्त्री यांच्या संपर्कात आलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून हे सर्व सध्या विलगीकरणात आहेत. रवी शास्त्री काही सहकाऱ्यांसोबत मिळून इंग्लंडमध्ये एका हॉटेलात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेले होते. त्यानंतर पाच दिवसांनी शास्त्री यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
हे ही वाचा:
केंद्राने चौकशी केली तर फटाक्यांची माळ फुटेल
या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद
बाप्पाच्या तयारीसाठी ऑनलाईन खरेदीला पसंती!
निर्बंध असले तरी वाजंत्र्यांना परवानगी द्या!
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना संबधित कार्यक्रमात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. बीसीसीआयला संबधित कार्यक्रमाचे काही फोटो मिळाले आहेत. त्यानुसार सर्व तपास सुरु असून या प्रकरणाबद्दल बीसीसीआय शास्त्री आणि कोहली यांच्याशी बोलणार आहे, असे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (इसीबी) देखील बीसीसीआय संपर्कात असून अशी कोणतीही घटना परत घडणार नाही यासाठी दोन्ही बोर्ड लक्ष ठेवून आहेत.
दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील सर्व खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या असेही अधिकाऱ्याने सांगितले.